निकृष्ट दर्जा आढळल्यास परिणाम भोगावे लागतील, कल्याण-शीळ रस्त्याच्या कामावरून राजू पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 07:47 PM2021-03-18T19:47:17+5:302021-03-18T19:48:53+5:30
MNS MLA Raju Patil News : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामाची गुणवत्ता खाजगी संस्थेच्या माध्यमातून तपासली जाईल.
कल्याण - भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामाची गुणवत्ता खाजगी संस्थेच्या माध्यमातून तपासली जाईल. ही गुणवत्ता निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास संबंधितांना त्याचे परिमाण भोगावे लागतील असा सज्जड इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संबंधितांना दिला आहे.
कल्याण शीळ रस्याच्या कामाची पाहणी आमदार पाटील यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्य रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी, मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, जिल्हा संघटक हर्षद पाटील, संतोष पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. हा रस्ता पूर्ण होईल याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या आहेत. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. रस्ते कामात गती नाही हे सातत्याने दिसून येत आहे. रस्त्या ज्या ठिकाणी सिमेंटचा तयार केला आहे.
त्याठिकाणी आत्ताच तडे गेलेले आहे. ज्या ठिकाणी जोड रस्ते या रस्त्याला येऊन मिळतात. त्याठिकाणी कल्वर्टची कामे झालेली नाहीत. त्यामुळे त्याठिकाणी एक बॉटेल नेक तयार झाला आहे. पावसाळ्य़ात कल्वर्ट तयार न झाल्याने त्याठिकाणी पाणी साचणार आहे. कल्वर्टची कामे काही ठिकाणी केली जात असली तरी यंदाच्या पावसाळ्य़ात रस्त्यावर पाणी साठणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यावर त्याची गुणवत्ता खाजगी संस्थेच्या माध्यमातून तपासली जाईल. त्यानंतर रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे उघड झाल्यास त्याचे परिमाण संबंधित अधिकारी वर्गास भोगावे लागतील असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
मागच्या आठवडय़ात राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापक विजय वाघमारे यांनी कल्याण शीळ रस्त्याच्या कामाविषयी महापालिकेच्या मुख्यालयात एक जंबो बैठक घेतली. या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलिस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकाही उपस्थित होते. या बैठकीपश्चात रस्ते विकास कामातील अडथळे दूर करुन काम येत्या पावसाळ्य़ार्पयत मार्गी लावले जाईल अशी माहिती दिली होती. त्या पश्चात आज आमदार पाटील यांनी स्वत: पाहणी करुन हे काम संथ गतीने सुरु असल्याचे स्पष्ट केल्याने काम नक्की कधी पूर्णत्वास येणार असा प्रश्न आत्ता उपस्थित केला जात आहे.