अंबरनाथच्या कोविड रुग्णालयात होतोय रेमडेसिविरचा काळाबाजार, मनसेचे स्टिंग ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:59 AM2021-05-10T07:59:43+5:302021-05-10T08:00:04+5:30
शनिवारी रात्री पालिकेच्या कोविड रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंजेक्शन विकणाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर चिठ्ठी पाठवून इंजेक्शन हवे आहे, असा संदेश आतमध्ये पाठवला होता.
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णालयात रुग्णवाहिकेच्या चालकाने दोन रेमडेसिविर बाहेरील व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.
शनिवारी रात्री पालिकेच्या कोविड रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंजेक्शन विकणाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर चिठ्ठी पाठवून इंजेक्शन हवे आहे, असा संदेश आतमध्ये पाठवला होता. ही चिठ्ठी मिळताच अवघ्या १५ मिनिटांत या ठिकाणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांना कॉल आला आणि त्यांनी दोन रेमडेसिविर इंजेक्शनसाठी तब्बल ४० हजार रुपयांची मागणी केली. रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेच्या चालकाने दोन रेमडेसिविर मनसेच्या कार्यकर्त्यांना देताच कार्यकर्त्यांनी त्याला पकडून नेमके हे इंजेक्शन आले कुठून, याबाबत माहिती घेतली. तसेच यासंदर्भात पालिका प्रशासनालादेखील माहिती दिली. ही माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नेमके हे इंजेक्शन आले कुठून, त्याची माहिती घेऊन संबंधितांनादेखील आरोपी करण्याची मागणी केली आहे.
पालिकेच्या कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या इंजेक्शनचा काळाबाजार केला असला तरी ज्या कंपनीचे इंजेक्शन बाहेर विकण्यासाठी काढण्यात आले होते ते इंजेक्शन डेंटल कॉलेजच्या कोविड केअर सेंटर मध्ये कधीच आले नाही असा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे. हे इंजेक्शन नेमके कोठून आले आणि त्या रुग्णवाहिकेच्या चालकाला कोणी दिले याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. दुसरीकडे या रुग्णालयात काम करणारे कर्मचारी या इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याच्या अनेक तक्रारी याआधी देखील प्राप्त झाल्या होत्या, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले न गेल्याने ही बाब उघडकीस आली नव्हती. हे इंजेक्शन पालिकेच्या कोड केअर सेंटरमधील आहे की खाजगी डॉक्टरांना पुरविण्यात येणाऱ्या इंजेक्शन मधील आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.
डॉक्टरांनी केला निषेध
रविवारी पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत निषेध व्यक्त करीत रुग्णालयाच्या गेटसमोर निदर्शने केली. रुग्णालयात दिवस-रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले जात असल्याची खंत या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.