रामदेव बाबांचे महिलांबाबत वक्तव्य म्हणजे त्यांच्या ब्रह्मचार्याला डाग - डॉ. श्रीपाल सबनीस
By मुरलीधर भवार | Published: November 26, 2022 04:13 PM2022-11-26T16:13:24+5:302022-11-26T16:13:59+5:30
संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी महापुरुषांना बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करू नका असे मत डॉ. सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.
डोंबिवली - रामदेव बाबा कितीही मोठे योगगुरु असला तरी त्यांनी महिलांच्या बाबतीत केलेले विधान निंदनीय आहे. महिलांनी कोणते कपडे वापरावे याबाबतचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना भारतीय संविधानाने दिलेले आहे. रामदेव बाबा यांसारख्या ब्रह्मचारी माणसाला हे वक्तव्य शोभत नाही. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या ब्रह्मचार्याला डाग असल्याचे विधान ज्येष्ठ विचावंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.स्वाभिमानी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त संविधान प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सबनीस यांनी उपरोक्त विधान केले. या सभेचे आयोजक लक्ष्मण अंभोरे, नितीन अहिरे, नंदीनी शेळके, जान्हवी झा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले की, स्वायत्त संस्था असलेल्या सीबीआय, इडी, आरबीआय या मधील सरकारचा वाढता हस्तक्षेप वाईट असून तो लोकशाहीसाठी मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हा महाराष्ट्र मराठी संस्कृतीचा अपमान आहे. हे वक्तव्य राज्यपालांना शोभणारे नक्कीच नाही. ज्यांना महाराष्ट्राचा अभ्यास, प्रेम आणि आपुलकी नाही अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात का पाठवतात? अशा लोकांना पंतप्रधानांनी परत बोलावणे योग्य ठरेल याकडे सबनीस यांनी लक्ष वेधले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीविषयी संशय व्यक्त करणे योग्य नाही. त्यांनी भोगलेल्या जन्मठेपेच्या शिक्षे दरम्यानच्या मरणप्राय यातना टाळण्यासाठी त्यांनी जर माफी मागितली असेल तर ती त्या माणसाची मर्यादा आहे. स्वातंत्र्यवीरांच्या मर्यादेचे भांडवल राजकीय स्वार्थासाठी करू नका. राजकीय संस्कृतीच्या मारामाऱ्यांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी शिवाजी महाराज आणि सावरकरांना वापरणे त्यांचे भांडवल करणे योग्य नाही. संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी महापुरुषांना बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करू नका असे मत डॉ. सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.