वाईन शॉप फोडून रोकड लंपास करणारे गजाआड, रामनगर पोलिसांची कारवाई
By प्रशांत माने | Published: June 16, 2023 02:30 PM2023-06-16T14:30:37+5:302023-06-16T14:32:09+5:30
आरोपींकडून ३ लाख ५० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे.
डोंबिवली: वाईन शॉपची घरफोडी करून आठ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. आरोपींकडून ३ लाख ५० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी कल्याण जिल्हा न्यायालयाने सुनावली.
सरूउद्दीन ताजउद्दीन शेख (वय ३२) रा. मुंब्रा, जुबेर जलील अन्सारी ( वय २६) रा. शिवडी,मुंबई आणि शहाबुद्दीन ताजउद्दीन शेख (वय ३२) रा.मुंब्रा अशी अटक आरोपींची नावे आहेत. ११ जूनच्या मध्यरात्री आरोपींनी डोंबिवली पूर्व येथील डिलक्स वाईन शॉपचे बंद दुकानाचे शटर कशाने तरी उचकटून तसेच आतील लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश करीत शॉपच्या ड्राव्हरमधील आठ लाखांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी १२ जूनला सकाळी वाईन शॉपचे मालक रविंद्र शेट्टी यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
घरफोडीची घटना रामनगर पोलिस ठाण्यापासून नजीक तसेच डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरच घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान या गुन्हयाच्या तपासकामी रामनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, योगेश सानप, पोलिस हवालदार सुनिल भणगे, विशाल वाघ, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, निसार पिंजारी आदिंचे पथक नेमण्यात आले होते. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सरूउद्दीन याच्यावर १५ तर जुबेर विरोधात एकुण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.