कल्याणमधील साकेत महाविद्यालयात रंगली मराठी बोली भाषेची काव्य मैफील
By सचिन सागरे | Published: February 27, 2024 04:21 PM2024-02-27T16:21:33+5:302024-02-27T16:21:59+5:30
विविध नामवंतांच्या कवितांबरोबरच मराठीच्या आगरी बोलीतील कविता देखील त्यांनी सादर केल्या
कल्याण : पूर्व येथील साकेत कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ' मराठी बोली भाषेच्या काव्यमैफिलीचे' आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कवी गजानन पाटील यांनी त्यांच्या शब्द स्पंदन या शुभारंभाच्या कार्यक्रमात आपल्या सुश्राव्य सादरीकरणातून मराठीतील बोलींचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला आणि विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.
विविध नामवंतांच्या कवितांबरोबरच मराठीच्या आगरी बोलीतील कविता देखील त्यांनी सादर केल्या. त्यांच्या समवेत कवी, लेखक ज्ञानेश्वर चिकणे आणि सुप्रसिद्ध संगीतकार सुमेध जाधव हे देखील उपस्थित होते. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता, नाट्य उतारे विद्यार्थ्यांपुढे सादर केले. कुसुमाग्रजांच्या बरोबरच मंगेश पाडगांवकर, महेश केळुसकर या इतर कवींच्या देखील सादर करण्यात आल्या आणि मराठी भाषेची समृद्धता विद्यार्थ्यांसमोर विदित केली.
या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे यांनी मराठी भाषेचे सौंदर्य, मराठी साहित्याचे विविध प्रकार त्यांचे उपप्रकार यावर विश्लेषणात्मक चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रिया नेरलेकर यांनी केले. तर आभाप्रदर्शन डॉ. शहाजी कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. राणी रघुवंशी, उपप्राचार्य प्रा. नवनाथ मुळे, प्रा. संजय चौधरी, प्रा. निलेश कुशवाहा, प्रा. प्रणाली भोसले, प्रा.रेणुका शिंगोळे आदी प्राध्यापक उपस्थित होते