डोंबिवलीमधील महिलेनं साकारली सप्तश्रृंगी देवीची रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 06:53 PM2021-10-13T18:53:52+5:302021-10-13T18:54:18+5:30
डोंबिवलीतील एमआयडीसी परीसरातील एकदंत हेरिटेज येथे राहणा-या स्मिता साळुंखे या एक कलाशिक्षिका आहेत. लहानपणापासूनच त्यांना रांगोळीची आवड होती.
कल्याण- सांस्कृतिक नगरी डोंबिवली शहरात प्रत्येक सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या शहराला अनेक कलावंत लाभले आहेत. हे कलावंत नेहमीच सण उत्सवाच्या निमित्ताने आपल्या कलेच्या माध्यमातून एक नवचैतन्य निर्माण करत असतात.सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. आणि याच औचित्य साधत डोंबिवलीतील एका महिलेनं वणीच्या सप्तश्रृंगी देवी अगदी हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. ही रांगोळी पाहून ही खरंच रांगोळी आहे की पेंटिंग ? असा विचार तुमच्या सुद्धा मनात आल्याशिवाय राहणार नाही.
डोंबिवलीतील एमआयडीसी परीसरातील एकदंत हेरिटेज येथे राहणा-या स्मिता साळुंखे या एक कलाशिक्षिका आहेत. लहानपणापासूनच त्यांना रांगोळीची आवड होती. सुरवातीला त्या ठिपक्यांच्या भव्यदिव्य रांगोळी काढायच्या.आता सगळीकडे पोस्टर आणि पोर्ट्रेटच्या रांगोळ्या काढल्या जात असल्याने स्मिता यांनी देखील अशा रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केला. विशेष बाब म्हणजेरांगोळीचे वेगळे कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतले नाही. परंतु रंगसंगती, शेडिंग, स्केचिंग यांचे ज्ञान असल्याने त्याचा उपयोग त्यांना रांगोळी काढताना झाला.
स्मिता यांनी साकारलेल्या सप्तश्रृंगी देवीची रांगोळी सध्या चर्चेचा विषय झालीये. कारण देवीच्या दागिन्यांपासून ते हावभाव हे सर्व बारकावे अगदी हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेत.रांगोळीतुन जणू काही देवीचे सजीव रूपच अवतरले असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय.देवीची ही रांगोळी 4 X4 फूट आकारात साकारण्यात आलीये. ही रांगोळी पाहण्यासाठी अनेक देवीभक्त येत असून आपल्या कलेची आवड प्रत्येकानं जोपासली पाहिजे असं मत स्मिता यांनी व्यक्त केलंय.