'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:55 PM2021-08-04T18:55:50+5:302021-08-04T18:56:33+5:30
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कल्याण कसारा मार्गावरील प्रवाशाने ते ट्विट केले असून त्या मार्गावर तिसर्या मार्गिकेचे काम २०१२ नंतर आता ९ वर्षात अवघे २७ टक्केच पुढे गेले असल्याबद्दल प्रवाशाने नाराजी दर्शवली.
उमेश विशे असे त्यांचे नाव असून ते एका प्रवासी संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत. कोविड काळात रेल्वे प्रवास नसल्याने सामान्य नागरिक पिचला असून त्याला कोणीही वाली नाही. त्यात रस्ते धड नसल्याने तो वाहतुकीचा पर्याय देखील खर्चिक आणि वेळखाऊ होत असल्याने नागरिक राज्य शासनावर तसेच केंद्र स्तरावर खूप नाराज आहेत.
सातत्याने त्यासंदर्भात मागण्या करून, पत्र पाठवून देखील त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यात।केंद्र राज्य यांमधील राजकीय द्वंद्व संपता संपत नसल्याने त्यात सामान्य नागरिक भरडला जात आहे. दानवे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच त्यांनी मुंबईची लोकल सामान्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य शासनाने पुढाकार घ्यावा आम्ही वरिष्ठ पातळीवर दिल्लीत प्रयत्न करू असे म्हंटले होते. तसेच मुंबईसह उपनगरातील रेल्वे स्थानकात जाऊन सर्वत्र जाऊन परिस्थिती जाणून घेणार असल्याचे म्हंटले होते. पण त्याचा अद्याप शुभारंभ झाला नाही का असा सवाल प्रवाशांनी विचारला होता. कल्याण।कसारा, कल्याण कर्जत या मार्गावर सध्या दोन मार्गिका आहेत त्यात तिसरी, चौथी मार्गिका करण्याचे नियोजन सुरू आहे. पण त्याला वर्षानुवर्षे उलटली तरीही प्रगती मात्र होत नसल्याने दिवसेंदिवस प्रवास जीवघेणा होत आहे.
एवढ्या वर्षात अवघे २७ टक्के प्रकल्प।पुढे सरकला असल्याने प्रवासी खूप नाराज आहेत. त्यामुळे तातडीने मार्गिकेचे काम हाती घ्यावे आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा दानवे यांच्याकडून असल्याचे विशे यांचे म्हणणे आहे. ट्विट हे प्रभावी माध्यम असून थेट संदेश मिळावा यासाठी मागणी व अपेक्षा मांडून व्यथा व्यक्त करण्यात आली. त्याला समाज माध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत असून प्रवाशांच्या भावनांना वाचा फोडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.