शरयू दातेच्या सुरावटीत रसिक डोंबिवलीकर मंत्रमुग्ध

By अनिकेत घमंडी | Published: November 6, 2023 01:43 PM2023-11-06T13:43:41+5:302023-11-06T13:44:01+5:30

अमृतोत्सवातील शरयू दातेच्या व्हॅायेजने  डोंबिवलीकरांनी साजरा केला रंगभूमी दिन .

Rasik Dombivlikar is mesmerized by Sharyu Date's Suravat | शरयू दातेच्या सुरावटीत रसिक डोंबिवलीकर मंत्रमुग्ध

शरयू दातेच्या सुरावटीत रसिक डोंबिवलीकर मंत्रमुग्ध

डोंबिवली: जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभमुहूर्तावर टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृतोत्सवातील पहिल्या पुष्पाचे आयोजन सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले होते. 

शरयू दाते इन व्हॅायेज या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ८० वर्षांच्या कालावधीतील महिला गायिकांचा प्रवास उलगडणारा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध संगित संयोजक   कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात तब्बल ३० हून अधिक महिला गायिकांच्या गाण्यांचा समावेश होता.
आजची आघाडीची पार्श्वगायिका आणि सा रे ग म प फेम शरयू दाते हिने आपल्या वैविध्यपूर्ण गायकीतून रसिकांना हा सांगितीक प्रवास घडविला. कार्यक्रमाचं आभ्यासपूर्ण निवेदन आर जे अमित यांनी केलं आणि प्रत्येक गायिकेबाबात, गाण्याबाबत माहिती देत त्यांनी रसिकांना जून्या काळातील आठवणींमध्ये रममाण केले.

 शरयू यांनी गेल्या ८० वर्षांत गाण्यांच्या गायिकीमध्ये झालेले बदल आणि प्रत्येक गायिकेचा गाण्यातील अनोखा अंदाज मोठ्या खुबीने सुमारे ६०० हून अधिक उपस्थित रसिकांसमोर सादर केला. त्यामुळेच रसिक डोंबिवलीकर प्रत्येक गाण्याला दिलखूलास दाद देत होते.
यामध्ये सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री काननदेवी यांच्यापासून ते आजच्या काळातील जोनिता गांधी पर्यंतचा प्रवास शरयूने अत्यंत कौशल्याने उलगडला.
अवघ्या अडीच तासांत ८० वर्षांचा कालखंड उलगडणं हे एक अवघड आव्हान कमलेश भडकमकर यांच्या कार्यक्रम बांधणीच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीने आणि शरयूने तिच्या अफाट ऊर्जेने व सातत्यपुर्ण रियाजाच्या जोरावर लिलया पेलले.
तूफान मेल, अखियॅां मिलाके, अफसाना लिख रही हू पासून सुरूवात करत, उषा मंगेशकर, आशा भोसले, सूमन कल्याणपूर, गिता दत्त, लता मंगेशकर, अल्का याग्निक, साधना सरगम, चित्रा, कविता कृष्णमुर्ती, मोनाली ठाकूर, श्रेया घोशाल आणि सुनिधी चौहान यांच्या गाण्यांची सफर घडवली.
बिहू या सणावर विविध कालखंडात रचलेली गाणी, लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी, ९० च्या दशकातील गाणी, ए आर रेहमान यांनी रचलेली गाणी असे विविध विषय आणि संदर्भ घेऊन अनेक मेडली देखीस सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता लता मंगेशकर यांच्या सावरे सावरे या सुप्रसिद्ध गाण्याने करण्यात आली. 

कार्यक्रमाच साथसंगत करण्यासाठी पेटीवर कमलेश भडकमकर, किबोर्डवर अमित गोठिवरेकर, दिप वझे, बासरीवादक वरद कठापूरकर, गिटारवादक अमोघ दांडेकर, ॲाक्टोपॅडवर दत्ता तावडे, ढोलकी वर सुप्रसिद्ध ढोलकीवादक निलेश परब आणि तबल्यावर आर्चिस लेले असा दमदार वाद्यवृंद होता. सर्व वादकांनी आपआपल्या सादरीकरणाने डोंबिवलीकरांची मनं जिंकली.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अमृतोत्सव या सहा कार्यक्रमांच्या शृंखलेतून होणाऱ्या निधी संकलनातून हम फाऊंडेशनद्वारे जम्मू काश्मिरमधल्या भारतीय शिक्षा समितीच्या शाळांना प्रयोगशाळेकरीता देणगी देण्याचा संकल्प केला आहे. कालच्या पहिल्याच पुष्पामध्ये मंडळातर्फे हम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील देशपांडे यांना एकूण देणगीतील पहिला भाग मंडळातर्फे सर्व रसिक प्रेक्षक आणि देणगीदार यांच्या वतीने आणि समक्ष देण्यात आला.  विशेष म्हणजे मंडळाच्या या समाजोपयोगी प्रकल्पाला सहकार्य करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक कमलेश भडकमकर यांनी देखील उत्स्फुर्तपणे आपल्या मनसा क्रिएशनच्या टिमतर्फे हम फाऊंडेशनला देणगी दिली.
कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ब्लिस जिव्हीएस फार्माचे दिक्षीत, सहप्रायोजक म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधाताई म्हैसकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक, लक्ष्मी नारायण संस्थेचे श्री माधव जोशी आणि इतर अनेक मान्यवर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
अमृतोत्सवातील द्वितीय पुष्पात  ८ डिसेंबर रोजी बासरीवादक अमर ओक आणि व्हॅायलिन वादक शृती भावे यांचा “फ्लूट ॲंड फिडल” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सदर कार्यक्रमासाठीच्या देणगी प्रवेशिका लवकरच उपलब्ध होणार असल्याचे अमृतोत्सव प्रमुख आणि मंडळाचे माजी अध्यक्ष संदिप वैद्य यांनी सांगितले.
तर अमृतोत्सवासाठी प्रायोजकत्व देण्याकरीता आणि अमृतोत्सवाद्वारे केल्या जाणाऱ्या शैक्षणिक मदतीकरीता आणखी निधी संकलनाची गरज आहे. त्यासाठी इच्छूक देणगीदारांनी पुर्णोत्सव सन्मानिका घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही स्वरूपात देणगी देण्याकरीता मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष  सुशील भावे यांनी केले.

Web Title: Rasik Dombivlikar is mesmerized by Sharyu Date's Suravat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.