"या" शाळेने जे केलं त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 02:48 PM2021-08-19T14:48:36+5:302021-08-19T14:54:31+5:30
Kalyan News : कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेतील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या पाल्यांना स्मार्टफोन देऊ शकत नाही.
कल्याण - कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून फी भरण्यावरून हायफाय इंग्रजी शाळांचे अनेक वाद समोर आलेत. इतकंच नाही तर फी अभावी अनेक विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविण्यापर्यंत शाळांची मजल गेली. मात्र कठीण काळात मराठी शाळाचं गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आल्याचं कल्याणमध्ये पाहायला मिळाले आहे. कल्याणमध्ये बालक मंदिर संस्थेच्या रवींद्र ओक शाळेने मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहावे म्हणून 35 गरजू - गरीब विद्यार्थ्यांना मोबाईलचे वाटप केले आहे. काही दिवसांपूर्वीच बालक मंदिर संस्थेने असा अनोखा उपक्रम हाती घेत सुमारे 40 गरजू विद्यार्थ्यांना मोबाईचे वाटप केले होते. आता पुन्हा एकदा बालक मंदिर संस्था विद्यार्थ्यांसाठी देवासारखी धावून आली आहे.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेतील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या पाल्यांना स्मार्टफोन देऊ शकत नाही. परिणामी विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही गोष्ट लक्षात घेत शाळेने आपल्या माजी विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेचे माजी विद्यार्थी मकरंद मुळे यांनी 15 स्मार्टफोन व 1995 च्या एसएससी बॅचने 15 स्मार्टफोन अशा प्रकारे शिक्षक, माजी विद्यार्थी यांच्याकडून आलेल्या जवळपास 35 मोबाईल फोन गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले. संस्थेच्या टिळक चौक येथील सभागृहात हा अनोखा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यांनी चांगलं कार्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण प्रयत्न केले तर मदतीचे हात पुढे येतात असे विचार मांडले. 95 च्या एसएससी बॅच तर्फे बोलताना अमोद गोरे यांनी शाळेत कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आमची बॅच सदैव तयार असल्याचं आश्वासन दिलं. शिक्षकांतर्फे उत्तम गायकवाड यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा विद्यार्थ्यावर झालेला परिणाम व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळेने व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. महिला पालकांनी आपले मत व्यक्त करताना त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती सांगितली.
कोरोनामुळे झालेले नुकसान सांगत असताना त्या भावनिक झाल्या. या परिस्थितीत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाकरिता करीत असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांनी शाळेचे व संस्थेचे आभार मानले. शालेय समितीचे अध्यक्ष विजय नाफडे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका नीता माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री देवस्थळी, कैलास सरोदे, पांडुरंग भारती, देवेंद्र कापसे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.