शेअर रिक्षाच्या प्रति प्रवासी भाड्यात पाच रुपयांची कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:37 PM2021-01-14T23:37:11+5:302021-01-14T23:37:35+5:30
कल्याण ते उल्हासनगर कॅम्प नं. ३ मार्ग : अघोषित भाडेवाढीकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : उल्हासनगर कॅम्प नं. ३ ते कल्याणदरम्यान शेअर रिक्षाच्या प्रति प्रवासी भाड्यात गुरुवारपासून पाच रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता २५ ऐवजी २० रुपये आकारले जाणार आहेत. अनलॉकमध्ये जूनपासून रिक्षा सुरू झाल्या. तेव्हापासून कल्याण आरटीओ क्षेत्रात अशा प्रकारची अघोषित भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे आरटीओने दुर्लक्ष केले आहे.
कोरोनापूर्वी कल्याण ते उल्हासनगर कॅम्प नं. ३ दरम्यानचे प्रति प्रवासी भाडे १७ रुपये होते. अनलॉकमध्ये दोन प्रवाशांसह रिक्षा व्यवसायास परवानगी देण्यात आली. एका सीटचे नुकसान टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी २५ रुपये भाडे आकारणे सुरू केले. कल्याण स्थानकातील रिक्षा स्टॅण्ड बुधवारी सुरू होताच गुरुवारपासून या मार्गावरील भाडे पाच रुपयांनी कमी करण्यात आले. मात्र, आता तीन प्रवासी घेतले जाणार आहेत. कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव व दुसरीकडे १६ जानेवारीपासून सुरू होणारे लसीकरण, याचा परिणाम म्हणून भाड्यात कपात केल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.
कल्याणच्या मुख्य रिक्षा स्टॅण्डवरून उल्हासनगर कॅम्प नं. १, २, ३ करिता शेअर रिक्षा सुटतात. त्यामुळे कॅम्प नं. ३ प्रमाणे सर्वच मार्गांवरील शेअरचे भाडे कमी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
कल्याण-खडकपाडा, लालचौकी, योगीधाम, बिर्ला कॉलेज, दुर्गाडी, रेतीबंदर, मेट्रो मॉल या मार्गावरील भाड्यातही अघोषित भाडेवाढ करण्यात आली होती. आरटीओने त्याविरोधात कोणतीच कारवाई केलेली नाही.
कल्याण-डोंबिवली भाड्यात दुपटीने वाढ
nकल्याण ते डोंबिवली या सहा किलोमीटरसाठी कोरोनापूर्वी प्रति सीट भाडे २५ रुपये आहे. मात्र, अनलॉकमध्ये त्यात दुपटीने वाढ करीत ५० रुपये आकारले जात आहेत.
nकल्याण-टिटवाळा प्रति प्रवासी ७० रुपये घेतले जात आहेत. सर्वांसाठी लोकल सुरू होत नाही, तोपर्यंत या अघोषित भाडेवाढीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागणार आहे, असे बोलले जात आहे.