प्रख्यात हॉटेल व्यावसायिक कीट्टा (अण्णा) रामा शेट्टी यांचे निधन
By अनिकेत घमंडी | Published: July 31, 2023 07:13 PM2023-07-31T19:13:29+5:302023-07-31T19:13:40+5:30
शेट्टी यांच्या निधनाने शहरातील मान्यवरांसह नागरिकांनी दुःख व्यक्त केले.
डोंबिवली: शहरातील जुन्या रहिवाश्यांपैकी एक आणि फडके पथ वरील लाखो खवैय्या आबालवृद्ध नागरिकांना त्यांच्या मनपसंत आवडीचे शकाहारी अन्नपदार्थ खायला घालणारे प्रसिद्ध मॉडर्न कॅफे, मॉडर्न प्राईड, मॉडर्न किचन या सगळ्या हॉटेलचे मुख्य संस्थापक कीट्टा (अण्णा) शेट्टी(९३) यांचे सोमवारी वार्धक्याने गावी बेंगलोर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात डोंबिवली हॉटेल अँड बार रेस्टोरंट असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी, शैलेश शेट्टी ही दोन मुले, सुना, नातू असा परिवार आहे. शेट्टी यांनी १९५० च्या सुमारास फडके पथ येथेच कॅफे हाऊस नावाने फिल्टर कॉफीचा व्यवसाय सुरू।केली होती. अत्यन्त साधी राहणी, स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे भोक्ता, पारदर्शक व्यवहार अशी त्यांची जनमानसात ख्याती होती. कित्ता शेठ या नावाने ते पंचक्रोशीत परिचित होते. शहरातील रा स्व संघ परिवारासह विविध सामाजिक संस्थांशी त्यांचे दृढ संबंध होते.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असे त्यांचे व्यक्तित्व होते. शाकाहारी अन्नपदार्थ असलेले हॉटेल असावे असा त्यांचा मुलांकडे आग्रह होता, शेवटपर्यंत त्यांनी हॉटेल व्यवसायात सुरू असलेल्या स्पर्धेच्या काळातही शाकाहारी हॉटेलचा आग्रह सोडला नव्हता, अजित, शैलेश या दोघांनीही वडिलांच्या मर्जी संभाळून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवला. शहरातील ४५ संस्था मिळून दिला जाणारा मानाचा पुरस्कार त्यांना दोन वर्षांपूर्वी जाहीर झाला होता, यासह अन्य विविध संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्यांच्या निधनाने शहरातील मान्यवरांसह नागरिकांनी दुःख व्यक्त केले.