टाकाऊतून साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:32 AM2021-03-11T00:32:28+5:302021-03-11T00:32:56+5:30

अशोक बरवे यांचा कलाविष्कार

A replica of the Shriram temple made from waste | टाकाऊतून साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

टाकाऊतून साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : अयोध्येत राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य - दिव्य मंदिर उभे आहे. मात्र, त्याआधीच डोंबिवलीतील अशोक बरवे यांनी त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. हे काम त्यांनी त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जो चार महिन्यांचा काळ सक्तीची विश्रांती म्हणून घरात बसून घालवला, त्या काळात केले आहे.

टाकाऊतून टिकाऊ यातून त्यांनी एक ते सव्वाफूट उंचीची प्रतिकृती तयार केली आहे. २९ ऑक्टोबरला त्यांच्या उखळीच्या  सांध्याची पुन: शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ४ महिने त्यांना बेडरेस्ट सांगितली होती. या काळात त्यांनी भरपूर वाचन केलेच, पण  मोबाइलवर चित्रपट, व्याख्याने, वेबसिरीजही पाहिल्या. मात्र, नंतर त्याचाही कंटाळा आला. काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्याचवेळी अयोध्येतील श्रीराम मंदिराची चित्रे, दृकश्राव्य ध्वनिचित्रफिती व काही लेखन त्यांच्या पाहण्यात, वाचनात आले. त्यातूनच त्यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा चंग बांधला. मंदिराचा आराखडा आधी त्यांनी कागदावर तयार केला. त्यानंतर रद्दी, वह्यांमधील पाने घेऊन त्याच्या घट्ट सुरनळ्या तयार करून मंदिराचे खांब तयार केले. तयार शर्ट, मिठाईचे खोके यापासून बाकीची बांधणी केली. हे सर्व पूर्ण झाल्यावर ॲक्रॅलिक रंगाने मंदिर रंगविले. तसेच वेगवेगळ्या आकाराचे जुन्या इमिटेशन ज्वेलरीमधील मणी त्यावर चिकटवून त्याला आणखी आकर्षक रूप दिले. श्रीरामाच्या प्रेरणेने आणि आशीर्वादानेच हे कार्य हातून घडले, असे त्यांनी सांगितले. आता नवी दिल्ली येथील  ‘अक्षरधाम’ची प्रतिकृती तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

एक महिन्याचा कालावधी 
बरवे यांना मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी महिना लागला, फेब्रुवारीमध्ये त्यांनी त्या कामाला सुरुवात केली. सगळे साहित्य मिळून अवघे १०० रुपये किंवा त्याहून कमीच लागल्याचे ते म्हणाले. रोज दोन तास त्यासाठी देऊन काम ७ मार्च रोजी 
पूर्ण झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: A replica of the Shriram temple made from waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.