खंबाळपाडा भोईरवाडी तलावातील मृत माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण
By अनिकेत घमंडी | Published: May 13, 2023 07:37 PM2023-05-13T19:37:18+5:302023-05-13T19:37:55+5:30
साथीचे रोग पसरण्याची भीती
अनिकेत घमंडी/डोंबिवली: ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत माशांच्या मुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून राहावे लागत आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिंती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
खंबाळपाडा येथील तलावात गणपती आणि इतर देवतांचे विसर्जन नित्यनेमाने होत असते. आता उन्हाळा लागल्यामुळे तलावातील पाणी आटले आहे. सदर तलावातील पाणी हिरवे झाले असून ते दूषित झाले असावे असा स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. असे असताना, अचानक आठ दिवसापासून येथे मासे मेल्यानंतर जी भयंकर दुर्गंधी येते. तशी तलावाच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत शोध घेतला असता, या तलावातील मासे मूर्त अवस्थेत आढळल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे मृत मासे खाण्यासाठी भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या तलावातील पाणी काढून साफसफाई करावी याकरिता काॅ.काळू कोमास्कर आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र याबाबत कारवाई करण्याबाबत महापालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना विचारले असता, सदर खंबाळपाडा तलावातील मासे मृत झाल्याची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. तेथे दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली असल्याचे सांगितले.