डासांच्या झुंडीने एमआयडीसीचे रहिवासी त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By अनिकेत घमंडी | Published: February 27, 2024 12:06 PM2024-02-27T12:06:23+5:302024-02-27T12:06:42+5:30
एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत.
डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या कित्येक महिन्यात निवासी परिसरात कीटक नाशक फवारणी/धुरिकरण झालेली नाही. महापालिका करतेय काय? असा सवाल रहिवाश्यांनी केला. उघड्या पावसाळी गटारातून सांडपाणी वाहत असल्याने डासांच्या उत्पतीत वाढ होऊन त्यांच्या झुंडी घरात प्रवेश करून नागरिकांना चावत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केडीएमसीकडे तक्रार करूनही काही त्याची दखल घेतली जात नाही अशी टीका दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केली.
जे तक्रारदार पाठपुरावा करतात त्या रहिवाशांचा इमारती पुरते फवारणी केली जाते. तरीही डासांचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून डासांपासून निर्माण होणारे संसर्ग नागरिकांना होऊन आजार झाल्यास त्यास जबाबदार कोण?असा सवाल नलावडे यांनी केला. जो पर्यंत उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून सांडपाणी वाहण्याचे बंद होत नाही तोपर्यंत हा डासांचा त्रास कमी होणार नाही. डास पैदास होण्याचे हे मुख्य कारण असून हे सांडपाणी बंदिस्त भूमिगत वाहिन्यांमधून न जाता उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून जाण्यापासून रोखले गेले पाहिजे. एमआयडीसी निवासी मधील भूमिगत सांडपाणी वाहिन्या या जुन्या झाल्याने ठिकठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. आता एमआयडीसी कडून नवीन सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम चालू असून ते काम पूर्ण होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत केडीएमसीने दिवसाआड चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी/धुरीकरण करणे हा एकमेव उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांना अपेक्षित आहे.
कोरोना काळात काही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांनी कमी दर्जाची कीटकनाशक फवारणी करून आणि त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकून श्रेय घेतले होते ते आता कुठे गेले असा सवाल नागरिकांनी केला. आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांनी चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी केडीएमसी कडून करून घ्यावी किंवा स्वखर्चाने करून मतदारांना दिलासा द्यावा असेही नलावडे म्हणाले.