एमआयडीसी निवासी भागात भटक्या कुत्र्यांची दहशत; नागरिक त्रस्त
By अनिकेत घमंडी | Published: February 19, 2024 10:29 AM2024-02-19T10:29:48+5:302024-02-19T10:32:18+5:30
निवासी भागात अंदाजे अजून पाच जणांना कुत्रे चावल्याचे समजते आहे.
डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात सद्या काही भटके कुत्रे नागरिकांना चावत असल्याचे दिसत असून वेळीच केडीएमसीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. पोटोबा हॉटेल ते मिलापनगर तलाव या मार्गावर कुत्र्यांच्या झुंडी दिसत असून त्यात काही कुत्री पिसाळलेली असावी अशी शक्यता असून अनिल मांजरेकर वय 70 वर्षे आणि प्रमोद चौधरी वय 68 वर्षे या ज्येष्ठ नागरिकांना पायाला कुत्रा चावल्याने त्यांचा पाय सुजला असून डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेऊन उपचार करीत आहेत.
शिवाय निवासी भागात अंदाजे अजून पाच जणांना कुत्रे चावल्याचे समजते आहे. येथील काही श्वानप्रेमी हे भटक्या कुत्र्यांना खाद्य टाकत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री जमा होतात. दुचाकी वाहनांच्या मागे भटकी कुत्री लागल्याचे दृश्य अनेक वेळा येथे पाहण्यास मिळत आहे. काही भटकी कुत्री शाळकरी मुलांच्या मागे पण लागत असल्याने ती मुले घाबरून जात आहेत. अनेक नागरिकांनी याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून अद्याप कार्यवाही होत नसल्याने दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.