६० टक्के नागरिकांना श्वसन व त्वचाविकार, डोंबिवलीच्या औद्योगिक वसाहतीमधील वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 09:03 AM2022-02-05T09:03:45+5:302022-02-05T09:04:17+5:30
Dombivli News : डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील ६० टक्के लोकांना श्वसनाचे किंवा त्वचेचे विकार जडले आहेत.
- मुरलीधर भवार
कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील ६० टक्के लोकांना श्वसनाचे किंवा त्वचेचे विकार जडले आहेत. वारंवार सर्दी होणे, घशाला सूज येणे किंवा त्वचेवर रॅशेस येणे अशा तक्रारींकरिता ही मंडळी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांबरोबरच वैद्यकीय व्यावसायिकांनीही रासायनिक कारखाने हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
डोंबिवलीतील धोकादायक आणि अतिधोकादायक १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. डोंबिवली निवासी भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा त्रास होत आहे. प्रदूषणामुळे वरचेवर आजारी पडलेले रुग्ण डॉक्टरांकडे उपचारांंसाठी हेलपाटे मारत असतात. प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के आहे, असे डॉक्टर सांगतात.
डोंबिवली औद्योगिक निवासी भागात गेल्या ३० वर्षांपासून कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. घनश्याम शिराली प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांनी सांगितले की, दमट हवामान असल्यामुळे प्रदूषणातील प्रदूषित घटकांचा मानवी शरीरावर थेट परिणाम होतो. प्रदूषणामुळे ॲलर्जी रिॲक्शन येते. नाकातून पाणी येणे, नाक चोंदणे, घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे असा त्रास जाणवत असल्याची तक्रार अनेक पेशंट वरचेवर करतात. श्वासनलिकेस सूज आल्यामुळे अनेकांना कोरडा खोकला होतो. तो जाता जात नाही. सारखी सर्दी होऊन काहींना सायनसचा आजार होतो. सर्दी वारंवार झाल्यास कानाला सूज येऊन ऐकू कमी येते. प्रसंगी कान फुटतो. कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया करावी लागते.
अनेकांना दम्याचा त्रास होतो. दररोज तपासणीकरिता येणाऱ्या दहा रुग्णांपैकी सहा रुग्ण प्रदूषणामुळे होणाऱ्या ॲलर्जिक रिॲक्शनचे असतात. त्यातून पुढे काही गंभीर आजार उद्भवतात.
रसायनमिश्रित पाणी रस्त्यावर
त्वचारोग तज्ज्ञांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, एमआयडीसी परिसरात बिगर रासायनिक कारखान्यांतही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायाचे त्वचारोग झाले आहेत. अनेकदा रासायनिक कारखाने रसायनमिश्रित पाणी रस्त्यात सोडून मोकळे होतात. अनेक कर्मचारी त्या सांडपाण्यातून प्रवास करतात व त्यांना रॅशेस येतात. काहींच्या हातालाही हवेतील रसायनांमुळे त्रास होतो.
फुफ्फुसाच्या कॅन्सरची शक्यता
n निवासी भागात राहणारे शल्यचिकित्सक डॉ. आशिष धडस म्हणाले की, डोंबिवली भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रदूषणामुळे आजारी पडण्याचा त्रास होतो.
n त्यांच्या कुटुंबातील नातेवाइकांनाही त्रास होतो. प्रदूषणामुळे फुप्फुसांचे विकार होतात. श्वास घेण्यास केवळ वयोवृद्ध आणि मध्यमवयीन नागरिकांनाच त्रास होत नाही तर लहान मुलांनाही त्रास होतो.
n लहान मुलांचा श्वास घेण्याचा रेट जास्त असतो. प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने काही महिन्यांनी एखाद्याला फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.