भाजपतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
By अनिकेत घमंडी | Published: August 21, 2023 11:31 AM2023-08-21T11:31:18+5:302023-08-21T11:32:49+5:30
दीडशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग पर्यावरण राखण्याचे दिले संदेश
अनिकेत घमंडी, डोंबिवली:गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना पर्यावरण राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यातही शाडूच्याच मूर्तीचा वापर करावा. शाडूची मूर्ती वजनदार असली तरी पर्यावरण राखते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नये, ती विरघळण्यास वेळ लागतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून ते पर्यावरणाला घातक आहे त्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून भाजपने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा घेतली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेशोत्सवनिमित्त कठोर नियमावली जाहिर केली असून त्यासाठी जनजागृती म्हणून ग्रामीण मंडळाच्या वतीने मंडल कार्यालय सुदामा नगर एमआयडीसी येथे ती कार्यशाळा घेतली. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य शाडू माती व साहित्य पुरवण्यात आले. त्यावेळी नागरिकांना पर्यावरण राखण्याचे संदेश देण्यात आले. सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी त्या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला, त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदू परब यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ग्रामीण मंडळ सरचिटणीस सूर्यकांत माळकर, पक्षाच्या वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर,मूर्तिकार सचिन तूपगावकर, तुलासिदास वाघ, समीर देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.