सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता मिळणार दिलासा; KDMC मुख्यालयात दरमहा संपन्न होणार पेन्शन अदालत
By मुरलीधर भवार | Published: May 30, 2023 07:09 PM2023-05-30T19:09:03+5:302023-05-30T19:09:22+5:30
सेवा निवृत्त कर्मचा-यांना उतार वयात निवृत्ती वेतन विषयक प्रश्नांसाठी महापालिकेत वारंवार खेटे घालावे लागू नयेत.
कल्याण : सेवा निवृत्त कर्मचा-यांना उतार वयात निवृत्ती वेतन विषयक प्रश्नांसाठी महापालिकेत वारंवार खेटे घालावे लागू नयेत. त्यांच्या सेवानिवृत्ती वेतन विषयक बाबी लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मुख्यालयात आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन अदालतीचे आयोजन करणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन संपन्न झाल्यावर सकाळी १०.३० च्या सुमारास पेन्शन अदालत घेतली जाईल. यासाठी विहीत नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत आपली पेन्शन विषयक तक्रार, निवेदन अर्ज महापालिका सामान्य प्रशासन विभाग मुख्यालयात पाठविणे आवश्यक आहे.
ही तक्रार आणि निवेदन अर्ज वैयक्तिक स्वरुपाची असावीत. पेन्शनधारक/कुंटुंब निवृत्तीधारक यांनी या पेन्शन अदालतीस उपस्थित राहणे आवश्यक असेल. आजारपणामुळे, वयोमानानुसार, अपरिहार्य कारणास्तव पेन्शनधारक हजर राहू शकत नसतील, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला लेखी स्वरुपात प्राधिकृत करावे. प्राधिकृत केलेल्या व्यक्तिने आपणास प्राधिकृत केल्याचे पत्र कार्यालयीन कामाच्या ८ दिवस अगोदर पोहचविणे आवश्यक आहे.
या पेन्शन अदालतीत चौकशीची, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, आश्वासीत सुधारीत योजनेबाबत थकबाकी मिळणेबाबतची प्रकरणे, सहाव्या-सातव्या वेतन आयोगाची थकबाकी बाबतची प्रकरणे, विहीत नमुन्यात नसलेले आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. पेन्शन अदालतीमुळे सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी वर्गास एक प्रकारचा दिलासा प्राप्त होणार आहे.