पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
By प्रशांत माने | Published: January 25, 2024 08:02 PM2024-01-25T20:02:22+5:302024-01-25T20:02:39+5:30
कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात अनिल जातक आणि महादेव चेपटे अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कल्याण: कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात अनिल जातक आणि महादेव चेपटे अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोपवलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. दरम्यान मनसेने पोलिस कर्मचा-यांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कडलग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कल्याण पश्चिमेकडील चिराग हॉटेल परिसरात सोमवारी दोन गटांत वाद झाला होता. एका गटातील काही तरूण आपली चारचाकी वाहने घेऊन त्या ठिकाणाहुन जात होते. घोषणाबाजी ऐकताच दुसरा गट आला. त्याठिकाणी वाद झाला आणि त्याठिकाणी गाडयांवर लाथा मारण्याचे आणि काचा फोडण्याचे प्रकार घडले. दरम्यान याबाबत सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस हवालदार त्या गोंधळ आणि वाद करणाऱ्या युवकांना थांबवून त्या गाडया बाहेर काढताना दिसत आहेत. या हवालदारांनी मोठा राडा होण्यापासून थांबवले आहे.
अशा परिस्थितीत त्यांचे कौतुक करायचे सोडून पोलिस विभागाकडून त्यांचे निलंबन केले गेले ही बाब लांच्छनास्पद आहे याकडे मनसेने निवेदनाव्दारे लक्ष वेधले आहे. ज्यांनी गोंधळ आणि वाद घातला अशांवर त्वरीत कारवाई व्हावी आणि पोलिस हवालदार यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस, कल्याण शहर अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांकडून पोलिस अधिकारी कडलग यांना निवेदन देण्यात आले.