"फेरीवाल्यांसह रिक्षाचालक, दुकानदारही आमच्या टार्गेटवर; आम्हाला रस्ते मोकळेच हवेत"
By प्रशांत माने | Published: March 29, 2023 03:50 PM2023-03-29T15:50:38+5:302023-03-29T15:51:08+5:30
आमदार राजू पाटील यांचा इशारा
डोंबिवली: रेल्वे स्थानक बाहेरील रस्त्यावर, पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांसह, दुकानदार आणि रिक्षाचालक आमच्या टार्गेटवर असून आम्हाला रस्ते मोकळेच हवेत असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला. पाटील यांनी बुधवारी स्थानकाबाहेरील रस्त्यांची दौरा करून पाहणी केली. प्रशासनाला इशारा देताना आम्ही आता रस्त्यावर उतरलोय, नागरिकांनी निश्चिंत रहावे याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.
रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मनसेच्या वतीने १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत मंगळवारी संपली परंतू फेरीवाला अतिक्रमण जैसे थे राहीले. यावर आमदार पाटील यांनी स्थानक परिसरात बॅनर झळकावून फेरीवाला मुक्त करण्याची डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा! असा इशारा केडीएमसीला दिला होता. त्यामुळे बुधवारी मनसेकडून खळखटयाक होण्याची चिन्हे होती. परंतु मनसेचे झळकलेले बॅनर पाहता प्रशासन सावध झाले आणि स्थानकाबाहेरील सर्व रस्ते फेरीवाला मुक्त असे चित्र गुरूवारी पहायला मिळाले. दरम्यान आमदार पाटील यांनी इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सकाळी स्थानक परिसराचा दौरा करून पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, विनोद पाटील, प्रल्हाद म्हात्रे, राहुल कामत, सुदेश चुडनाईक, मनोज राजे, हर्षद पाटील, निशाद पाटील, कोमल पाटील, संदीप (रमा) म्हात्रे, प्रशांत पोमेंडकर यांसह अन्य पदाधिकारी आणि मोठया संख्येने कार्यकर्ते होते. आम्ही येणार म्हणून रस्ते फेरीवाले मुक्त झाले मग ही कारवाई रोज का होत नाही अशा शब्दात आमदार पाटील यांनी प्रभाग अधिका-यांना झापले. पाहणी दौऱ्यात त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत फेरीवाला व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि वाहतूक पोलिसांशी देखील चर्चा केली. मीटर रिक्षा स्टॅण्ड चालू करा, स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, फेरीवाला पुर्नवसनासाठी देखील पुढाकार घ्यावा, रस्ते मोकळे ठेवा अशा सूचना पाटील यांनी केल्या.
आमदारांचा खासदारांना सल्ला
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूरला एक रस्ता खराब होतो म्हणून अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केली. आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे देखील पाहणो त्यांनी गरजेचे आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा या स्थानकाबाहेर काय परिस्थिती आहे हे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना झापले पाहिजे. ही टीका नाही माझा सल्ला आहे. सर्व पक्षांनी एकत्र बसून जर लक्ष दिले तर चित्र बदलून लोकांना चांगली सेवा मिळू शकते याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.
खालपासून वरपर्यंत सर्वच हप्तेखोर
आमच्याकडून कारवाई चालू असते या अधिकाऱ्यांच्या विधानावर आमदार पाटील हे चांगलेच संतापले त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी चांगलेच खडसावले. खालपासून वर्पयत सर्वच हप्तेखोर आहेत. याची लिस्टच बाहेर काढेन. ओला आणि सुका अशा प्रकारात हप्ता वसूल केला जातो. प्रत्येकाकडून ५०० रूपये हप्ता घेतला जातो. प्रतिदिन तीन ते चार लाखांर्पयत हप्ता गोळा केला जातो असा गौप्यस्फोट पाटील यांच्याकडून करण्यात आला.