खड्डे बुजविण्याची मोहीम कधी उघडता?, स्वच्छता अभियानास आलेल्या उपायुक्तांना रिक्षावाल्यांचा सवाल
By प्रशांत माने | Published: August 28, 2022 07:26 PM2022-08-28T19:26:57+5:302022-08-28T19:27:50+5:30
गणपती आगमनापुर्वी रस्त्यातील खड्डे बुजवा असे आदेश मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी अधिका-यांना दिले आहेत
डोंबिवली : गणरायाचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. एकिकडे ही मोहीम अधिकाऱ्यांकडून राबविली जात असताना दुसरीकडे शहरातील रिक्षाचालक मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी शनिवारी या मोहीमेत सहभागी झालेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांना स्वच्छता मोहीम राबवता मग रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी मोहीम कधी राबविणार असा जाब विचारला.
गणपती आगमनापुर्वी रस्त्यातील खड्डे बुजवा असे आदेश मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी अधिका-यांना दिले आहेत. खड्डे बुजविले नाहीत तर कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची तंबी देखील त्यांनी दिली आहे. यामुळे काही ठिकाणी खड्डे भरण्याच्या कामाला गती आली असली तरी अजूनही काही रस्ते अजूनही खड्डयातच असल्याचे पहायला मिळत आहे. याचा त्रास नागरीक, वाहनचालक आणि रिक्षाचालकांना होत आहे. या त्रासातूनच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी असलेले जोशी यांनी शनिवारी केडीएमसीच्या ह प्रभाग कार्यालयासमोर चाललेल्या स्वच्छता अभियानाच्या वेळी थेट उपायुक्त पाटील यांना खड्डे भरण्यासाठी मोहीम कधी उघडणार असा सवाल केला. त्यावर पाटील यांनी खड्डयांचा त्रास होतोय हे वास्तव आहे. पण, मनपाच्या बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे जोशी यांना सांगितले. दरम्यान स्वच्छता अभियानाच्या वेळी घडलेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.