दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रायडर्स’; बोर्डाच्या परीक्षेसाठी शहर वाहतूक शाखेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 07:26 IST2025-02-20T07:25:49+5:302025-02-20T07:26:30+5:30
बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली, तर २१ फेब्रुवारीला दहावीची परीक्षा आहे. सीबीएसई बोर्डाची १० वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रायडर्स’; बोर्डाच्या परीक्षेसाठी शहर वाहतूक शाखेचा उपक्रम
डोंबिवली : बारावी व दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वतीने शाळा, महाविद्यालयांच्या हद्दीत रायडर्स म्हणजेच वाहतूक शाखेचे हवालदार तैनात केले आहेत. रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटची कामे आणि कोंडीमुळे वाहतूक शाखेने बोर्डाच्या परीक्षांच्या कालावधीत उपक्रम हाती घेतला आहे.
बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली, तर २१ फेब्रुवारीला दहावीची परीक्षा आहे. सीबीएसई बोर्डाची १० वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. डोंबिवली शहरात बहुतांश ठिकाणी सिमेंट काँक्रिट आणि बाजूकडील गटारबांधणीची कामे सुरू आहेत. या कामांनिमित्त काही रस्त्यांवर प्रवेशबंदी आहे, तर काही ठिकाणी वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. रस्त्यांच्या कामांचा फटका बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी श्रीराम पाटील यांच्या अध्यक्षतेत शाळा, महाविद्यालयांच्या हद्दीतील प्रमुख मार्गांसाठी रायडर्स नेमले आहेत. ते महत्त्वाच्या मार्गांवर दुचाकीवरून गस्त घालून वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून खबरदारी घेणार आहेत. या कामी चार रायडर्स नेमले आहेत.
शहरातील या भागात राहील रायडर्सची गस्त
पोलिस हवालदार सुधाकर कदम यांना पूर्वेकडील स. वा. जोशी हायस्कूल - वि. पी. रोड - नेहरू रोड- फडके रोड- स्व. इंदिरा गांधी चौक - भगतसिंग रोड - टिळकचौक येथील जबाबदारी आहे.
पोलिस हवालदार रवींद्र कर्पे यांच्याकडे टिळकचौक - मानपाडा चार रस्ता - आईस फॅक्टरी - दत्तनगर चौक - नांदीवली रोड मार्ग देण्यात आला आहे.
पोलिस हवालदार दिलीप परदेशी यांना पश्चिमेकडील महात्मा फुले चौक - दिनदयाळ चौक - कोपरब्रीज - कोल्हापुरे चौक - बावनचाळ - महालक्ष्मी कॉर्नर - महात्मा फुले चौक मच्छी मार्केट या मार्गावर तर पोलिस हवालदार गणेश बोडके यांचा रेतीबंदर चौक - मोठागाव - स्वामीनारायण सिटी - रेल्वे फाटक येथील मार्गावरील वाहतुकीवर वॉच असणार आहे.