एमआयडीसीत रस्त्याच्या कामात नाल्यांवरील वाढीव पुल, चेंबर्स, आरसीसी भिंतींचे धोकादायक बांधकाम गेले वर्षभर अर्धवट स्थितीत
By अनिकेत घमंडी | Published: March 7, 2024 10:47 AM2024-03-07T10:47:41+5:302024-03-07T10:48:52+5:30
एमआयडीसी निवासी मधील चार बिल्डिंग गौरी नंदन सोसायटी आरएच १२२ जवळ मोठ्या नाल्यावरील रस्त्याच्या वाढीव पुल, आरसीसी भिंतीचे बांधकाम, सांडपाणी चेंबर्स इत्यादींचे काम एका वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते.
डोंबिवली: एमआयडीसी निवासी मधील चार बिल्डिंग गौरी नंदन सोसायटी आरएच १२२ जवळ मोठ्या नाल्यावरील रस्त्याच्या वाढीव पुल, आरसीसी भिंतीचे बांधकाम, सांडपाणी चेंबर्स इत्यादींचे काम एका वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. परंतू ते बांधकाम गेले वर्षभर बंद असून अर्धवट स्थितीत तसेच पडून आहे.
त्यातून सळ्या बाहेर आल्या असून आता त्या गंजायला लागल्या असून असे हे अर्धवट बांधकाम का पडून आहे याबाबत एमएमआरडीए आणि एमआयडीसी प्रशासनाकडून काहीच माहिती मिळत नसल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्या अर्धवट बांधकामामुळे नाल्यातील वाहते पाणी अडल्याने साचून राहून दुर्गंधी येत आहे. शिवाय यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एखादे वाहन सदर पुलावरून जाताना जर अपघात होऊन नाल्यात गेले तर तेथील बाहेर आलेल्या गंजलेल्या लोखंडी सळ्या लागून वाहनधारकाला मोठी इजा होऊ शकते. एमआयडीसी मध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे.
काही ठिकाणी नाल्यावरील पुल हे अरुंद असल्याने रस्त्यांची रुंदी वाढण्यासाठी अशी कामे सुरू आहेत. त्यात सांडपाणी चेंबर्स आणि संरक्षक भिंती बांधण्याचे काम होणार होते. आता काही दिवसावर पावसाळा जवळ आला आहे त्यावेळी या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. शिवाय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार फेऱ्या, मिरवणुका इत्यादीमुळे या धोकादायक, अर्धवट नाल्यावरील बांधकाम मुळे एखादी दुर्घटना होऊ शकते. प्रशासनाने सदर अशी अर्धवट बांधकामे तातडीने पुरी करावीत अशी अपेक्षा येथील दक्ष नागरिक राजु नलावडे यांनी व्यक्त केली.