दरोडा, जबरी चोरी गुन्ह्यातील सराईत चोरटे गजाआड; ३ जणांना केले जेरबंद
By प्रशांत माने | Published: April 5, 2023 05:44 PM2023-04-05T17:44:28+5:302023-04-05T17:44:36+5:30
दोघा रिक्षाचालकांसह एका अल्पवयीन आरोपीचा समावेश, यातील चंद्रकांत आणि सत्यप्रकाश हे दोघे रिक्षाचालक आहेत. पाच आरोपींवर एकुण ३२ गुन्हे दाखल आहेत.
डोंबिवली - हातावर पोट असणा-या तसेच खाद्यपदार्थ हातगाडी चालकांसह कारचालकांना लुटणा-या पाच जणांच्या टोळीपैकी तीन जणांना जेरबंद करण्यात मानपाडा पोलीसांना यश आले आहे. ताब्यात घेतलेला अन्य एक आरोपी अल्पवयीन आहे तर आणखी एकाचा शोध सुरु आहे. संबंधित आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर हत्या, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत करणे, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून ९ मोबाईल, १ लॅपटॉप, रोकड, गुन्हयात वापरलेली रिक्षा असा २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ओला कारचालक राजन चौधरी हे कार घेऊन २४ मार्च ला नेवाळी नाका बदलापूर पाईप लाईन रोडला मध्यरात्रीच्या सुमारास आले असताना त्यांना नेवाळी येथून भाडे असल्याचा कॉल ओला कंपनीकडून आला. त्याप्रमाणे नेवाळी येथून तीन पॅसेंजर घेऊन ते डोंबिवली घरडा सर्कल याठिकाणी आले असता त्यांच्या कारला एका रिक्षाने कट मारला व रिक्षा त्यांच्या कारच्या पुढे उभी केली राजन हे कारमधून खाली उतरले असता. रिक्षातील दोघांनी त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या खिशाची तपासणी करू लागले. राजन हे कार मध्ये बसण्याचा प्रयत्न करत असताना कार मध्ये बसलेले तिघे खाली उतरले आणि त्यांनीही राजन यांच्याशी वाद घालायला सुरवात केली. रिक्षातील दोघे आणि ओला कारमधून आलेले तिघे अशा पाचही जणांनी राजन यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील रोकड असलेले पाकीट जबरीने काढून ते पाचही जण रिक्षातून पळून गेले. त्यानंतर राजन हे कारमध्ये येऊन बसले असता त्यांनी कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल बसलेल्या पॅसेंजरने चोरून नेल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी राजन यांनी शनिवारी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (क्राईम) बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, अविनाश वनवे, सुरेश डांबरे, भानुदास काटकर यांचे पथक नेमले होते. पथकाने घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्याच बरोबर तांत्रिक तपासाच्या आधारे विविध ठिकाणी सापळा लावत पाच जणांच्या टोळीचा म्होरक्या चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार याच्यासह शिवा तुसंबल, सत्यप्रकाश कनोजिया या तिघांसह अन्य एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. यातील चंद्रकांत आणि सत्यप्रकाश हे दोघे रिक्षाचालक आहेत. पाच आरोपींवर एकुण ३२ गुन्हे दाखल आहेत.
अशी करायचे लुटमार
ही पाच जणांची टोळी ओला कार बुक करायची यामधील तिघे जण बुक केलेल्या कार मध्ये बसायचे तर उर्वरित दोघेजण रिक्षाने ओला कारचा पाठलाग करून सुनसान जागेत कार थांबवून चालकाला लुटायचे. रस्त्याने जाणा-या वाहनाला मुद्दाम कट मारून चालकाशी वाद घालायचे आणि त्यालाही मारहाण करीत लुटायचे अशी त्यांची गुन्हयाची पद्धत होती. तर कधी खाद्य पदार्थाच्या हातगाड्या लावणा-यांनाही ते चाकूचा धाक दाखवीत लुटायचे.