राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा!
By नितीन पंडित | Published: August 22, 2022 03:24 PM2022-08-22T15:24:19+5:302022-08-22T15:25:11+5:30
या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली.
- नितीन पंडित
भिवंडी : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या छैलसिंह नावाच्या मुख्याध्यापकाने इंद्र देवाराम मेघवाल या ८ वर्षाच्या निरागस दलित विद्यार्थ्याने तहान लागली म्हणून मुख्यध्यापक छैलसिंहच्या मटक्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून छैलसिंहने आठ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेलार मिठपाडा ते भिवंडी तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चा प्रसंगी सेक्युलरचे कार्यकर्ते आकाश साळुंखे, प्रदीप गायकवाड,अजिंक्य गायकवाड,दिनेश जाधव,अमोल तपासे,रवी सोनावणे यांच्यासह महिला व नागरिकांसह शाळेचे विद्यार्थी व वकील देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयासमोर पोलोसांनी या मोर्चास अडवल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.
यावेळी मयत विद्यार्थी इंद्र मेघवाल हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. त्यांनतर सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्यासह शिष्ठमंडळाने भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. हे निवेदन शालेय विद्यार्थींनी तहसीदारांकडे सोपविले व या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली.
दरम्यान, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात पाण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण व हत्या होते, ही घटना देशासाठी निंदनीय असून या घटनेस जबाबदार असलेल्या आरोपीस कठोर शासन करावे तसेच अशा प्रकारच्या देशातील घटनांना रोखण्यासाठी केंद्र शासनाने विशेषउपाय योजना करावी अन्यथा आरपीआय सेक्युलरच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे.