कल्याण-डोंबिवली महापालिकेला प्रदूषणमुक्तीसाठी ३३ कोटी रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 06:14 PM2021-07-29T18:14:34+5:302021-07-29T18:15:00+5:30
Kalyan-Dombivali : केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगानुसार महापालिका क्षेत्रातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी निधी दिला जातो. त्यानुसार केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी वर्ग करण्यात आला होता.
डोंबिवली : महापालिका क्षेत्रातील वाढत्या वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून महापालिकेला ३३ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगानुसार मिलियन प्लस सिटी योजनेतून दोन दिवसांत पालिकेच्या खात्यात निधी जमा होईल. महापालिकेला हा निधी मिळविण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून प्रयत्न केले जात होते.
केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगानुसार महापालिका क्षेत्रातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी निधी दिला जातो. त्यानुसार केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र, तो कल्याण-डोंबिवली महापालिकेला मिळाला नव्हता. या बाबत खासदार म्हणून कपिल पाटील यांनी २९ जून रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविले होते. तसेच संबंधित निधी लवकरात लवकर वर्ग करण्याची विनंती केली होती.
केंद्रीय राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर कपिल पाटील यांनी निधी वेगाने मिळविण्यासाठी प्रयत्न केले. अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या खात्यात ३३ कोटी ११ लाख रुपये निधी दोन दिवसांत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
कल्याण-महापालिकेने हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मिलियन प्लस सिटी योजनेतून आराखडा तयार केला आहे. त्यात वृक्षारोपण, उद्योगाचे नुतनीकरण, विद्युत वा गॅस शवदाहिनी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिग्नल, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, प्रदूषण रोखण्यासाठी हवा शुद्धीकरण युनिट व हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्र उभारले जाईल.