संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन

By मुरलीधर भवार | Published: August 29, 2022 10:20 PM2022-08-29T22:20:29+5:302022-08-29T22:21:55+5:30

कल्याण : माजी शिक्षक आमदार प्रभाकर अनंत संत यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी कल्याण येथे वार्धक्याने निधन झाले. कल्याण ...

RSS senior volunteer and former teacher MLA Prabhakar Sant passed away | संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन

googlenewsNext

कल्याण : माजी शिक्षक आमदार प्रभाकर अनंत संत यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी कल्याण येथे वार्धक्याने निधन झाले. कल्याण मुंबई असा विविध सामाजिक कामासाठी फिरणारा एक कर्मयोगी अशी त्यांची ख्याती होती. लहानपणापासून ते संघाचे स्वयंसेवक होते. संघाचे काम करत असताना वनवासीक्षेत्रात आणि खेडोपाड्यात ग्रामीण विद्यार्थ्यांना हवी तशी शिक्षणाची सुविधा नाही, हे पाहून एक स्वयंसेवक म्हणून काय करता येईल, असा विचार ते करू लागले. त्यावेळचे विभाग प्रचारक दामुआण्णा टोकेकर, भाऊराव सबनीस, माधवराव काणे, भगवानराव जोशी यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करावी असा विचार त्यांनी केला.

जिल्हा प्रचारक दादा चोळकर व भगवानराव जोशी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी छत्रपती शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा व त्यायोगे ठाणे जिल्ह्या खेडोपाडी शाळा सुरू कराव्यात, असा संकल्प केला. 

सुरुवातीला विनायक प्रिंटिंग प्रेसच्या बाजूच्या जागेत या कामाला सुरुवात केली. नंतर जागा मिळाल्यावर टिळक चौकात अभिनव विद्या मंदिर हे उभे राहिले. त्यानंतर जेथे जेथे जागा मिळेल त्या गावी त्यांनी शाळा उघडण्याचा सपाटा लावला. अनेक संस्थांच्या बंद पडू पाहणाऱ्या शाळा दत्तक घेऊन त्यांनी त्या शाळा चालवल्या, त्यामुळे आज ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळा प्राथमिक, माध्यमिक  उच्च माध्यमिक, तसेच महाविद्याल अशा स्तरापर्यंत सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात शिक्षणाचा पाया भक्कम करणारे शिक्षण महर्षी म्हणून संत यांचा उल्लेख करावा लागेल.

 ते उत्तम वक्ते, संघटक, लेखक, व अभ्यासू विचारवंत होते. त्यामुळे अनेक संस्थांना संत सरांनी आपल्या संस्थेत काम करावे, असे वाटे आणि संत सरांनीही कोणाला कधीही निराश केले नाही. त्यांच्या साहित्य विषयक कामामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या प्रांत कार्यकारणीमध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासद करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य व शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या ठाण्याच्या ब्राह्मण सहाय्यक संघासाठीही त्यांनी खूप मोठा निधी जमा करून दिला. संत दरवर्षी सावरकर साहित्य संमेलन हे घेत असत व सावरकर साहित्यावर एक अंकही काढत असत त्याची विक्रीही करत असत. अनेक सामाजिक संस्थांची त्यांनी स्थापना केली.  कल्याणच्या काव्य किरण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. आज काव्य किरण मंडळ आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. 

 छत्रपती शिक्षण मंडळाचा कारभार काही वर्षे त्यांनी एका हाती चालवला वसंतराव पुरोहित, सदानंद फणसे, शामराव जोशी व भास्करराव मराठे यांनी छत्रपती शिक्षण मंडळाची धुरा सांभाळल्यावर त्यांनी छत्रपती शिक्षण मंडळाची सुत्रे त्यांच्या हाती देवून दुसरी सामाजिक कामे करण्यास मोकळे झाले.

त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम बघून शिक्षक परिषदेने त्यांना शिक्षक मतदार संघाचे तिकीट दिले. संत हे सर्व महाराष्ट्रातील शाळांमध्ये व शिक्षकांमध्ये असलेला विस्तृत संपर्क यामुळे सहजपणे निवडून आले. विधान परिषदेत शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. शिक्षकांसाठी ते कायम उपलब्ध असत. अनेक संदर्भ, अनेक शासकीय निर्णय त्यांना तोंडपाठ असत. अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने त्यांनी विधान परिषदेत शिक्षकांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिला. कल्याणचे लुडस हायस्कूल, इंदिरानगर झोपडपट्टीतील शाळा, आंबेडकर रोडवरील शाळा यासाठीही त्यांनी खूप मेहनत केली. वाचन लेखन भाषण, अशा सर्व स्तरांवर त्यांनी कायम लक्ष दिले अत्यंत लोकप्रिय व कार्यरत असणारे अनेक संस्थांना आर्थिक दृष्ट्या प्रबल करणारे कायम पायाला भिंगरी असणारे असे ते संत होते. तीन वर्षात आजारपणामुळे ते कोठेही बाहेर जाऊ शकले नाहीत तरी त्यांचे जमेल तसे वाचन, साहित्य क्षेत्राची माहिती घेणे चालू असे. अत्यंत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या या कर्मयोगाचे निधन झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.

 त्यांच्या मागे तिन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संत सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील योगदानाला कधीच विसरता येणार नाही असे काव्यकिरण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख म्हणाले.
 

Web Title: RSS senior volunteer and former teacher MLA Prabhakar Sant passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.