नियम मोडले, 125 व्यापाऱ्यांवर गुन्हे, केडीएमसीचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 05:21 AM2021-03-31T05:21:57+5:302021-03-31T05:22:20+5:30
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते; परंतु त्या विरोधात रास्ता रोको करून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या १२५ हून अधिक व्यापाऱ्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शनिवार आणि रविवारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते; परंतु त्या विरोधात रास्ता रोको करून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या १२५ हून अधिक व्यापाऱ्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. फ प्रभागक्षेत्र अधिकारी भरतकुमार पाटील यांनी याप्रकरणी सोमवारी तक्रार दाखल केली होती.
मनपा हद्दीत दरदिवशी नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ९०० हून अधिक आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने शनिवारी आणि रविवारी दुकानांमध्ये नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी दोन दिवस दुकाने बंद करण्याचा आदेश काढला होता; परंतु शनिवारी सकाळीच या आदेशाबाबत नाराजी व्यक्त करून व्यापाऱ्यांनी मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांनी मनपाचे अधिकारी आणि पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून इंदिरा चौक ते टिळक पुतळ्याकडे जाणाऱ्या भगतसिंग रोडवर वाहने आडवी लावून रास्ता रोकोदेखील केला होता. या आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्याचबरोबर काहींनी मास्कदेखील लावला नव्हता. यामुळे प्रभाग अधिकारी पाटील यांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
मोकाट फिरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर नजर
कल्याण : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने केडीएमसीने अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेशन असलेले अनेक जण शहरात मोकाट फिरत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी ते राहत असलेल्या सोसायटीला पोलीस फोन करून ताकीद देणार आहेत. त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
कोरोनासंदर्भातील आयुक्तांची एक बैठक मंगळवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झाली. यावेळी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर आयुक्तांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी वाढला होता. त्यावेळी प्रत्येक वॉर्डात कोरोना नियंत्रण समिती नेमली होती. त्यात नगरसेवक होते. त्यात आता माजी नगरसेवकांचाही सहकार्य घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांची मदत घेतली जाईल. कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. बैठकीतील चर्चेनुसार पाटीदार भवन येथील कोविड सेंटर येथे आणि दोन आरोग्य केंद्रांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील जी खासगी रुग्णालये मोफत लसीकरण करण्यास तयार आहे, त्यांना लसीकरण केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्याचा विचार करण्यात येणार आहे. पाच दिवस पुरेल इतका लसीचा साठा मनपाकडे आहे. लसीचा नवीन साठा बुधवारी, ३१ मार्चला येणार आहे.
‘शिष्टमंडळाद्वारेही मागणी करता आली असती’
डोंबिवलीत व्यापाऱ्यांनी केडीएमसी निर्बंधांविरोधात शनिवारी रस्त्यावर ठिय्या दिला. दुकानदारांना एक दिवसाची शिथिलता हवी होती. त्यानुसार त्यांना ती दिली. व्यापाऱ्यांनी जबाबदारीने कोरोनाचे नियम पाळले पाहिजे होते. रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा शिष्टमंडळाद्वारे प्रशासनाकडे मागणी करता आली. नियम मोडले म्हणून १२५ व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई योग्य असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
‘आदेश सगळ्यांनाच लागू’
शिथिलता देऊनही काही दुकानदारांनी कोरोना नियमावलीचा भंग केला. तसेच दारूची दुकाने उघडी होती. उत्पादन शुल्क विभागाकडून दारूच्या दुकानदारांना सूचित केले गेले नसल्याची बाब समोर येत असल्याने त्यांना यापुढे सूचित केले जाईल. मात्र, साथरोग नियंत्रणात एका विशिष्ट यंत्रणेसाठी नियम काढता येत नाही. आदेश हा सगळ्य़ांनाच लागू असतो, असे आयुक्तांनी सांगितले.