भाजप-शिंदे गटात जाण्याच्या अफवा, ओमी कलानी तुतारी चिन्हावर रिंगणात राहणार!
By सदानंद नाईक | Published: October 2, 2024 07:14 PM2024-10-02T19:14:48+5:302024-10-02T19:15:28+5:30
उल्हासनगरातील राजकारणात व सोशल मीडियावर ओमी कलानी हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील किंवा भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
उल्हासनगर : भाजप व शिंदेंसेनेत जाण्याच्या अफवेला पूर्णविराम देत ओमी कलानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत घेऊन कमलेश निकम व मनोज लासी यांनी दिली. उमेदवारीबाबत वरिष्ठांची चर्चा झाल्याचे निकम म्हणाले.
उल्हासनगरातील राजकारणात व सोशल मीडियावर ओमी कलानी हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील किंवा भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत कलानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याचे म्हटले आहे. कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक कमलेश निकम, मनोज लासी, अजित माखिजानी, आनंद शिंदे व पंकज त्रिलोकांनी यांनी बुधवारी दुपारी कलानी महल येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी कलानी कुटुंब हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून गेल्या विधानसभेला भारत गंगोत्री यांना पक्षाने तिकीट देऊनही वेळेवर ज्योती कलानी यांना उमेदवारी दिल्याचा इतिहास आहे, असे निकम म्हणाले.
शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व पप्पू कलानी यांच्यात तिकीट वाटपाबाबत चर्चा झाली. त्यामुळे तुतारी निशाणी ओमी कलानी यांना मिळणार आहे. महाआघाडीकडून जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर होईल, तेव्हा त्यामध्ये ओमी कलानी यांचे नाव असेल, असे संकेत निकम यांनी दिले असून कलानी कुटुंबाने निवडणूक प्रचार सुरू केल्याचेही निकम म्हणाले. महाआघाडीचे मित्र पक्ष असलेल्या स्थानिक ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वीच कलानी यांना पाठिंबा घोषित केला आहे. ओमी कलानी तुतारी चिन्हावर निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचेही निकम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कलानीवर ३ विधानसभेची जबाबदारी
माजी आमदार पप्पू कलानी यांच्यावर महाविकास आघाडीकडून उल्हासनगरसह अंबरनाथ, कल्याण पूर्वेची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती कमलेश निकम व मनोज लासी यांनी दिली. त्या दृष्टिकोनातून कलानी यांनी तिन्ही विधानसभेचा प्रचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला कलानी कुटुंब गैरहजर
कलानी महल येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद कलानी समर्थक घेत होते. मात्र पत्रकार परिषदेला माजी आमदार पप्पू कलानी, शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी यांची गैरहजेरी खटकत होती.