व्यापाऱ्याच्या अपहत बालकाची सुरतेहून सुखरूप सुटका; पोलीसांनी जीव धोक्यात घालत आरोपींना ठोकल्या बेडया
By प्रशांत माने | Published: November 13, 2022 04:30 PM2022-11-13T16:30:46+5:302022-11-13T16:31:08+5:30
येथील १२ वर्षाच्या रूद्रा झा या मुलाची अपहरणकत्र्याच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रूद्राचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी दिड करोड रूपयांची खंडणी मागितली होती.
डोंबिवली: येथील १२ वर्षाच्या रूद्रा झा या मुलाची अपहरणकत्र्याच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रूद्राचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी दिड करोड रूपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान ७५ तासांच्या थरारक तपासात पोलिसांनी जीव धोक्यात घालत पाच आरोपींना बेडया ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
फरदशहा रफाई (वय २६) हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर हत्या, घरफोडी आणि दारूची तस्करी प्रकरणी गुजरात राज्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासह त्याचा मेव्हणा प्रिंसकुमार सिंग (वय २४), फरदशहाची प्रेयसी शाहीन मेहतर (वय २७), त्याची बहीण फरहीन सिंग (वय २०), पत्नी नाझीया (वय २७) यांना अटक केली आहे. बुधवारी रूद्रा हा सकाळी ८ वाजता क्लासला गेला होता परंतू तेथून तो घरी परतलाच नाही. त्याचे वडील रंजीत यांना मोबाईलवर कॉल आला समोरच्या व्यक्तीकडून मुलाचे अपहरण केल्याची माहीती देत सुटकेसाठी दिड करोड रूपये मागितले होते. याप्रकरणी रंजीत यांनी मानपाडा पोलीस ठाण्य्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या संवेदनशील गुन्हयाच्या तपासकामी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी २० पथके तयार केली होती. सीसीटिव्ही कॅमेराच्या आधारे अपहरण करणारी गाडी डोंबिवली, बदलापूर, खडवली. जव्हारमार्गे पुढे गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हे मुख्य रस्त्याचा वापर न करता आडमार्गाने, गाव खेडयातून जात होते. त्यामुळे गाडीचा माग काढणो पथकांना अडचणीचे ठरत होते. त्यांच्या गाडीची नंबरप्लेट देखील बनावट होती. तपास आव्हानात्मक असल्याची जाणिव होताच दस्तुरखुद्द पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, उमेश माने-पाटील यांच्यासह अन्य अधिका-यांनी नाशिक येथे मार्गस्थ होऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथला परिसर पिंजून काढला.
पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
जव्हार मोखाडा येथून प्रवास करताना वरीष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाला दिसली. त्यांनी काही अंतरावर असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल तारमळे, अविनाश वनवे यांना आरोपींची गाडी अडविण्यास सांगितले. त्यावेळी सुसाट वेगाने येणा-या आरोपींनी गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि पुढे गाडी नेऊन ती तिथेच जंगलात सोडून दरीतून पलायन केले. गाडीत दोन धारदार सुरे, अपहत मुलाची चप्पल आणि शाळेची वही अशा वस्तू मिळाल्या. आरोपी पुढे पालघर मार्गे सूरतला पळून गेल्याची माहीती खब-यामार्फत मिळाली. त्यानुसार तेथील खुडसत या गावातील एका घरावर छापा टाकून पाचही आरोपींना अटक करून अपहत रूद्रा ची सुखरूप सुटका केली. विशेष बाब म्हणजे रूद्रा चे वडील रंजीत यांचेही पार्किगच्या वादातून काही वर्षापूर्वी अपहरण झाले होते. त्यांचीही पोलीसांनी सुखरूप सुटका केली होती.
टिमचे पथक
ठाणे, कल्याण डोंबिवलीतील पोलिसांसह नाशिक, जव्हार-मोखाडा, पालघर आणि सूरत येथील पोलीस या सर्व ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. अत्यंत संवेदनशील अशा गुन्हयाचा छडा लावणा-या पोलिसांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला जाणार असल्याची माहीती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली. विशेष बाब म्हणजे या तपासात ठिकठिकाणच्या सुमारे ४०० ते ४५० स्थानिक नागरीकांची मदत मिळाल्याचे शिंदे म्हणाले.
पोलिसांबद्दल विश्वास होता
आमच्या मुलाची ते सुखरूप सुटका करतील असा आम्हाला पोलिसांबद्दल विश्वास होता. त्यामुळे गोपनीयता बाळगताना त्यांना सर्वतोपरी सहकार्य केल्याचे रंजीत झा म्हणाले तर मला मारहाण करण्यात आली नाही. मात्र अधून मधून धमकाविले जायचे. ते मला डाळ-भात खायला दयायचे असे रूद्रा यावेळी म्हणाला.