वजीर सुळका सर करून बिपीन रावत यांना सलामी, सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर ग्रुपची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:20 PM2021-12-21T21:20:52+5:302021-12-21T21:22:36+5:30
कल्याणच्या सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर या गिर्यारोहक ग्रुपने चढाईसाठी सर्वात कठीण असलेला वजीर सुळका सर करून बिपीत रावत यांना सलामी दिली. त्यांनी सुळका सर करून सुळक्यावर राष्ट्रध्वज फडकवित रावत यांचे छायाचित्र असलेला बॅनर उंचावून आदर व्यक्त केला.
कल्याण - भारताच्या तिन्ही दलाचे सैन्य प्रमुख बिपीन रावत यांचे लष्कराच्या हेलीकॉप्टर अपघातात निधन झाले. कल्याणच्या सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर या गिर्यारोहक ग्रुपने चढाईसाठी सर्वात कठीण असलेला वजीर सुळका सर करून बिपीत रावत यांना सलामी दिली. त्यांनी सुळका सर करून सुळक्यावर राष्ट्रध्वज फडकवित रावत यांचे छायाचित्र असलेला बॅनर उंचावून आदर व्यक्त केला.
शहापूर पासून नजीक असलेल्या माहूली गडानजीक वजीर सुळका आहे. हा सुळका तब्बत 280 फूट उंच आहे. हा सुळगा गिर्यारोहकांसाठी आव्हान असतो. कारण हा सुळका चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. हा सुळका 90 अंश कोनातील असून सुळक्यावर जाण्यासाठी पहिला आणि दुसरा टप्पा सोपा असला तरी तिसरा, चौथा आणि पाचवा टप्पा हा अत्यंत कठीण आणि एकच व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर उभी राहू शकते इतपतच त्याठिकाणी जागा आहे.
सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुपने यापूर्वी हा सुळका सर केला आहे. या ग्रुपची ही दुसऱ्यांदा चढाई होती. शहापूर तालुक्यातील वासिंद गावापासून हा सुळका जवळ आहे. गिर्यारोहक सुशील राऊत, प्रफुल्ल वाळूंज, संतोष आंबरे आणि सचीन राणो यांना सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुपने सहकार्य केले. ग्रुपचे भूषण पवार, पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजीत भोसले, प्रदीप घरत, निलेश पाटील, अभिषेक मोरे, सुनील कणसे आदी या चढाईत सहभागी झाले होते. या गिर्यारोहकांनी शहीद रावत यांना आदरांजली वाहण्यासाठी गिर्यारोहण केले. हेच या मोहिमेचे वैशिष्ट्य होते. शनिवारच्या रात्री मोहिम करणारे सदस्य वाशिंदला जाऊन पोहचले होते. मोहिम सकाळी पाच वाजून 15 मिनिटांनी सुरु झाली. अवघ्या 2 तास 45 मिनिटांत या गिर्यारोहकांनी हा सुळका सर केला. पहिला व दुसरा टप्पा पटकन पार करण्यात आला. त्यानंतर तिसरा, चौथा आणि पाचवा टप्पा सर केला गेला. मोहिम फत्ते होताच रावत यांच्या स्मरणार्थ सुळक्यावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला गेला. रावत यांना सलामी दिली गेली.