सख्खे भाऊ पक्के चोर, नव्या कोऱ्या 3 बुलेटसह 11 गाड्या हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:44 PM2021-02-06T16:44:25+5:302021-02-06T16:48:07+5:30
पोलिसांनी केली दोघा भावांना अटक, मानपाडा पोलिसांनी उघड केली चोरी
कल्याण/डोंबिवली - दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही भावांनी चोरी केलेल्या 11 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या दोन भावांची नावे योगेश महेश भानूशाली आणि मुकेश महेश भानूशाली अशी आहेत. या दोघांचा साथीदार समीर अकरम सय्यद अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पण, पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी ही चोरी सीसीटीव्हीच्या सहाय्याने उघकीस आणली.
कल्याण डोंबिवली परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी डोंबिवली पूर्व भागात एक बुलेट चोरीला गेली होती. त्या बुलेट चोरीचा सगळा प्रकार एका सीसीटीव्हीत कैद झाला होता. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी चक्कीनाका परिसरातील एका तरुणाला चौकशीकरीता ताब्यात घेतले. त्या तरुणाचे योगेश महेश भानुशाली होते. त्याची अधिक चौकशी केली असता, तो व त्याचा भाऊ मुकेश महेश भानूशाली आणि त्याचा साथीदार समीर अकरम सय्यद हे तिघे मिळून दुचाकी चोरी करीत होते. पोलिसांनी दोन्ही सख्या भावाना अटक केली आहे. मात्र, समीर हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पोलिसांनी या दोन्ही सख्ख्या भावांकडून चार लाख 90 हजार रुपये किंमतीच्या 11 दुचाकी हस्तगत केल्या आहे. हस्तगत करण्यात आलेल्या 11 दुचाकींपैकी तीन बुलेट आहेत. या बुलेट नव्या कोऱ्या आहेत. मुकेश हा जीम ट्रेनर आहे. तर त्याचा भाऊ योगेश हा कोणत्याही दुकानावर काम करीत होता. दोन्ही भावांनी दुचाकी चोरीचा सपाटा लावला होता. चोरी केलेल्या दुचाकी ते विकण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक हरीदादा चौरे यांनी केला आाहे.