शाळकरी महाविदयालयीन मुला मुलींना वयोवृद्ध महिला करायची अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By प्रशांत माने | Published: April 10, 2024 06:48 PM2024-04-10T18:48:02+5:302024-04-10T18:49:07+5:30
दरम्यान तीला रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी जवळपास एक महिना पाळत ठेवून तीला बेडया ठोकल्या. तीच्याकडून साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे.
डोंबिवली: शाळकरी, महाविदयालयीन मुला मुलींना अंमली पदार्थांची विक्री करणा-या वयोवृद्ध महिलेला टिळकनगर पोलिसांनी सापळा लावून अटक केली. एक वयोवृद्ध महिला ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान तीला रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी जवळपास एक महिना पाळत ठेवून तीला बेडया ठोकल्या. तीच्याकडून साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे.
सलमाबेगम नूर मोहम्मद शेख (वय ६२) रा. कचोरेगाव, हनुमान नगर, पत्रीपूल कल्याण पश्चिम, असे अटक आरोपी महिलेचे नाव आहे. याआधीही तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक होऊन तीची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. परंतू कारागृहाबाहेर येताच येताच तीने पुन्हा एकदा अंमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरू केला. ती शाळकरी आणि महाविदयालयीन मुला मुलींना पुन्हा एकदा अंमली पदार्थ विकते अशी माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजयकुमार कदम यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीला पकडण्यासाठी विशेष पथक नेमले होते.
साध्या वेशात शाळेच्या छतावर महिनाभर ठेवली पाळत -
सलमाबेगम ही शाळकरी आणि महाविदयालयीन मुला मुलींना ब्राऊन शुगर पुरवत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तीला रंगेहाथ पकडण्यासाठी एका शाळेच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर महिनाभर पाळत ठेवली होती. तीला ताब्यात घेतल्यावर तीच्याकडे ३६ हजार ७९० रूपयांची रोकड आणि पाच लाख २० हजार रूपये किमतीचे १०४ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर असा एकुण पाच लाख ५६ हजार ७९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला.