समर्थ रामदास अन् गजानन महाराज हे त्या काळचे अटल बिहारी आणि नरेंद्र मोदी : टिळक
By अनिकेत घमंडी | Published: January 27, 2024 02:27 PM2024-01-27T14:27:42+5:302024-01-27T14:28:35+5:30
दत्तनगर उत्कर्ष मंडळ , गुरुदत्त सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला
डोंबिवली: समर्थ रामदास आणि संत गजानन महाराज यांच्याविषयी तुलनात्मक बोलणें म्हणजे सद्यस्थितीत दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तुलनात्मक बोलण्या सारखे आहे. पण समर्थ रामदास आणि गजानन महाराज हे दोघेही त्यांच्या त्यांच्या काळाचे , त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचे अटलही होते आणि मोदीही होते असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ , प्रसिध्द वक्ते आणि लेखकचन्द्रशेखर टिळक यांनी केले. दत्तनगर उत्कर्ष मंडळ , गुरुदत्त सोसायटी आणि सौरभ केटरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक यांची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी समर्थ रामदास आणि गजानन महाराज या विषयावर ते बोलत होते.
समर्थ रामदास आणि गजानन महाराज यांचा काळ आजच्या पेक्षा वेगळा होता. तसेच तो त्यांच्या एकमेकांच्या काळा पेक्षाही वेगळा होता. तरीही या दोघांच्या कार्यात आणि प्रभावात खुप साम्य आहे. त्यांच्यात असणारे साम्य या दोघांच्या जीवनातील प्रसंग , त्यांनी मांडलेले प्रासंगिक विचार , त्यांची कार्यपद्धती याबाबतची अनेक उदाहरणें देत टिळक यांनी या दोघांच्यातील साम्य आणि फरक श्री. टिळक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात अतिशय ओघवत्या शैलीत मांडला. समर्थ रामदासांचे कार्य जास्त करून सामूहिक व संस्थात्मक पातळीवर भर देणारे होते ; तर तुलनेने गजानन महाराजांचे कार्य वैयक्तिक पातळीवर भर देणारे होते असे विवेचन अनेक दाखले देत टिळक यांनी याप्रसंगी केले. या दोघांचीही कार्याची वैचारिक गरज आजच्या काळात कशी आहे याचे विवेचन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.