डोंबिवलीतील कोपर खाडीकिनारी रेती उपसा, ग्रामस्थांनी उघडकीस आणली चोरी

By प्रशांत माने | Published: March 5, 2023 07:26 PM2023-03-05T19:26:46+5:302023-03-05T19:27:06+5:30

पश्चिमेकडील कोपर खाडीकिनारी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रेती उपसा प्रकाराचा स्थानिक ग्रामस्थांनी काल मध्यरात्री पर्दाफाश केला.

Sand mining along Kopar creek in Dombivli villagers exposed the theft | डोंबिवलीतील कोपर खाडीकिनारी रेती उपसा, ग्रामस्थांनी उघडकीस आणली चोरी

डोंबिवलीतील कोपर खाडीकिनारी रेती उपसा, ग्रामस्थांनी उघडकीस आणली चोरी

googlenewsNext

डोंबिवली:

पश्चिमेकडील कोपर खाडीकिनारी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रेती उपसा प्रकाराचा स्थानिक ग्रामस्थांनी काल मध्यरात्री पर्दाफाश केला. रेती उपसा करणारे बाज आणि बोट ग्रामस्थांकडून रंगेहाथ पकडण्यात आली मात्र रेती उपसा करणारे पळून जाण्यात यशस्वी ठरले. या रेती उपसाची माहीती तहसील प्रशासनाला देताच त्यांचे पथक आणि विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून रेती उपसा करणारे बाज आणि सेक्शन पंप सह बोट पेटवून देत नष्ट करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निमित्ताने कोपर खाडीकिनारी शेतजमिनींच्या परिसरात बेकायदेशीरपणे होणा-या रेती उपसाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवली असो अथवा कल्याण खाडी परिसरात रात्रीच्या अंधारात रेती उपसा होत असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. खाडीसह खाडीलगतच्या शेत जमिनींर्पयत रेतीचा उपसा करणा-यांची मजल गेल्याने शेतक-यांच्या जमिनी नापीक बनल्या आहेत. स्थानिक शेतकरी आणि नागरीकांकडून अनेकदा पोलिस आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र याउपरही रेती उपसा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा कोपर खाडीतील रेती उपसा प्रकारातून समोर आले आहे. काल मध्यरात्रीच्या अंधारात काहीजण रेती उपसा करताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास पडले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बोटीमधील रेती उपसा करणा-यांना अटकाव करीत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्याच दरम्यान ओहोटी लागल्याने रेती उपसा करणारा बाज आणि बोट खाडीकिनारीच अडकली. रात्रभर याठिकाणी ग्रामस्थांनी पहारा दिला. रविवारी सकाळी याची माहीती स्थानिक ग्रामस्थ आणि केडीएमसीचे माजी सभापती रमेश म्हात्रे यांना ग्रामस्थांकडून देण्यात आली. ते देखील घटनास्थळी आले. तहसीलदारांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने पोलिसांसह तत्काळ धाव घेत रेती उपसा करणारा बाज आणि सेक्शन पंप बोटीसह पेटवून दिला. दरम्यान रेती उपसा करणा-यांविरोधातील कारवाईत सातत्य असावे अशी मागणी माजी सभापती म्हात्रे यांनी केली आहे.

Web Title: Sand mining along Kopar creek in Dombivli villagers exposed the theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण