संत नामदेव महाराजांची जयंती राज्यस्तरावर साजरी करावी; कपिल पाटील यांचे मत, CM शिंदेंना पत्र
By अनिकेत घमंडी | Published: November 29, 2023 12:00 PM2023-11-29T12:00:07+5:302023-11-29T12:00:15+5:30
वारकरी सांप्रदायातील थोर संत अशी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची ओळख आहे.
डोंबिवली: देशभर अभंग व किर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म प्रसाराबरोबरच जनजागृती करणारे राष्ट्रसंत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती राज्य स्तरावरून शासनाने साजरी करावी, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
वारकरी सांप्रदायातील थोर संत अशी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची ओळख आहे. ते शिंपी समाजाचे आराध्यदैवत आहेत. संत नामदेवांनी महाराष्ट्राबरोबरच पंजाबमधील श्री क्षेत्र घुमान येथे १८ वर्ष राहून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले होते. त्यांना पंजाबमध्ये संत भगत नामदेव म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या प्रमुख ग्रंथ गुरुग्रंथ साहेबामध्ये संत नामदेवांच्या ६१ दोह्यांचा समावेश आहे. त्यांच्या नावाने घुमान येथे विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही संत नामदेवांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची जयंती राज्य सरकारने साजरी करण्याची मागणी अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, मध्यवर्ती संस्था यांनी केली. तरी संत नामदेव महाराजांची जयंती राज्य सरकारकडून साजरी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.