डोंबिवलीत आजपासून ‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ मोहीम, माजी विद्यार्थी झाले आक्रमक, साखळी उपोषणाचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:16 PM2024-06-14T12:16:21+5:302024-06-14T12:18:27+5:30
'Save Pendharkar College' Campaign: के. व्ही. पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच जुनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ असा नारा देत आज, शुक्रवारी १४ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थी साखळी उपोषण करणार आहेत.
डोंबिवली - के. व्ही. पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच जुनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवण्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ असा नारा देत आज, शुक्रवारी १४ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थी साखळी उपोषण करणार आहेत.
पेंढरकर कॉलेज बचाव मोहिमेचे संयोजक सोनू सुरवसे म्हणाले की, हे कॉलेज अनुदानित आहे. ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे. त्याला सरकारची मान्यता नाही. मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरू आहे. अनुदानित ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक भरडले जाणार आहेत. कॉलेज विनाअनुदानित झाल्यावर शैक्षणिक फीमध्ये सवलत असलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरावी लागेल. त्याचा भुर्दंड पालकांना बसेल. त्यामुळे कॉलेजच्या मनमानीविरोधात शुक्रवारपासून साखळी उपोषण करणार आहोत.
प्रशासनाने काढली नोटीस, दिला इशारा
डोंबिवलीशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी सर्व अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एक नोटीस काढली आहे.
या नोटिसीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत उच्च न्यायालय कोणताही निर्णय देत नाही, तोपर्यंत डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या हजेरीपटावर आपली हजेरीची नोंद ठेवली जाईल. जेणेकरून तुम्हा सर्वांना शासनाकडून वेतन मिळेल.
शासनाकडून जोपर्यंत तुमची योग्य ठिकाणी नियुक्ती होत नाही, तोपर्यंत मधल्या काळात जर आपण मंडळाविरुद्ध किंवा मंडळाच्या कोणत्याही कार्यकारिणी सभासदांविरुद्ध कोणतेही भाष्य अथवा बेकायदा भाष्य, बेकायदा वर्तन केल्यास आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार मंडळ राखून ठेवत आहे, याची नोंद घ्यावी.
अनेकांचा पाठिंबा
पेंढरकर कॉलेज बचाव मोहिमेला १५ माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर लाल बावटा रिक्षा युनियन, कामगार सेना, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बॉम्बे युनिव्हर्सिटी व कॉलेज टीचर युनियन, शिवगर्जना भाजी व फळे विक्रेते संघटना, आरएसपी शिक्षक संघटना, साईश्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था, क्रीडाशिक्षक मंडळ, पेंढरकर महाविद्यालय मित्र समूह, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.
शिक्षण विभागाचे ‘पेंढरकर’ला खडेबोल, ज्युनिअर काॅलेज बंद करता येणार नाही!
डोंबिवली : पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना विनाअनुदानित करण्याचा प्रस्ताव हा सरकारच्या नियमाचे उल्लंघन करणारा आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव देऊन १०० टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय बंद करता येणार नाही, असे खरमरीत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पाठविले आहे.
फी वाढणार नाही’
कॉलेज विनाअनुदानित झाले तरी फी वाढ न करता विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोशल मीडियावर संस्थेची बदनामी करीत आहेत. त्यामागे स्वत:ची सरकारी नोकरी टिकवून ठेवणे आणि कामचुकारपणा करून विद्यार्थ्यांना शिक्षण न देता भरमसाठ पगार मिळविणे, हा हेतू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन डोंबिवली शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने कॉलेजच्या परिसरात करण्यात येत आहे.
काय आहे पत्रात?
पेंढरकर कला, विज्ञान व वाणिज्य ज्युनिअर कॉलेज हे अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय बंद करून स्वयंअर्थसहाय्यित ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे.
१०० टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय बंद करता येणार नाही. ही बाब शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. आपण शिक्षकांना मानसिक त्रास देत आहात.
आपण शिक्षकांना अध्यापनाचे काम करू देत नसल्याबाबत मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटना व आपल्या अनुदानित ज्युनिअर कॉलेज सहाय्यक शिक्षक यांच्याकडून या कार्यालयास तक्रार आलेली आहे.
आपल्या १०० टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शासन नियमांपेक्षा जास्त फी आकारण्यात येत असल्याची शिक्षक संघटना
व अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षक यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीचे निराकरण करावे.