मध्य रेल्वे कोलमडली, पावसाचा फटका! बदलापूर रेल्वे मार्गावर पॉईंट फेल झाल्यानं वाहतूक विस्कळीत
By अनिकेत घमंडी | Published: September 13, 2022 09:28 AM2022-09-13T09:28:17+5:302022-09-13T09:30:06+5:30
लोकल गाड्या विलंबाने धावत असतील तर त्याबाबत प्रवाशांना अवगत करावे, उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना द्यायला हव्यात मात्र तसे काही होत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
डोंबिवली : रात्रभर पावसाची रिपरिप सुरू असतानाच बदलापूररेल्वे मार्गावर पॉईंट फेल झाल्याची घटना मध्यरात्री उशिराने घडली. यामुळे लांबपल्याच्या गाड्यांसह लोकल वाहतूक पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. बिघाड शोधून त्याची दुरुस्ती करण्याचे काम पहाटे ५.३० पर्यन्त सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित बिघाडाचा फटका बदलापूर स्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मंगळवारी सकाळी बसला.एरव्ही त्या स्थानकातून सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी निघणारी लोकल यायला विलंब झाला आणि आल्यावर निघायला देखील विलंब झाल्याने स्थानकात तोबा गर्दी झाली होती. गाडीत प्रवेश करण्यासाठी देखील प्रवाशांना खूप त्रास झाला, स्थानकातच गाडी तुडूंब भरल्याने पुढील सर्व स्थानकात त्या लोकलमध्ये प्रवेश करणे अन्य प्रवाशांना शक्य नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
तसेच लोकल गाड्या विलंबाने धावत असतील तर त्याबाबत प्रवाशांना अवगत करावे, उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना द्यायला हव्यात मात्र तसे काही होत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती, त्या बिघाडाचा परिणाम सकाळच्या सत्रात उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने त्या मार्गावरील लोकल सेवा प्रभावित झाल्याने वेळापत्रक कोलमडले.