सण उत्सवावर वारेमाप खर्च करणाऱ्या नगरसेवकांनी मनावर घेतले तर...
By अनिकेत घमंडी | Published: September 23, 2022 10:46 AM2022-09-23T10:46:03+5:302022-09-23T10:46:39+5:30
नागरिकांनो खड्ड्यांवरून आक्रोश करू नका, विद्यानिकेतन शाळा संस्थापकांनी हाणले शाल जोडीतले
डोंबिवली: खड्ड्यांवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण पेटलेले असतानाच डोंबिवलीत देखील त्याचे पडसाद जनसामान्यांच्यात बघायला मिळत आहेत. येथील विद्यानिकेतन या शाळेने थेट नगरसेवक लोकप्रतिनिधीना टार्गेट करत त्यांना शालजोडीतले हाणले आहेत. ते म्हणतात नागरिकांनो काही काळजी करू नका , नेत्याच्या वाढदिवसाला आणि प्रभागात मिरवायला सणासुदीच्या काळात वारेमाप निधी खर्च करणाऱ्या नगरसेवकांनी शहरातील एकेक वॉर्ड टू वॉर्ड रस्त्याची जबाबदारी घेतली तर एकही रस्त्यावर खड्डा राहणार नाही. नागरिकांना नववर्षाचे कॅलेंडर पाठवणे, ग्रिटींग पाठवणे, उत्सवांना निधी देणे यापेक्षा गैरसोयीची जबाबदारी घ्यावी असे त्यांनी बोचरी टीका करून सुचवले आहे.
शाळेचे संस्थापक ज्येष्ठ दक्ष नागरिक विवेक पंडित यांनी याबाबत आवाज उठवला असून त्यांनी त्यांच्या शाळेच्या मुख्य रूटवर शाळेच्या मागे असे उपरोधिक जनजागृती करणारे फलक।पुन्हा एकदा लावले असल्याने त्याची चर्चा तर होणारच. विशेषत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, अन्य कर्मचारी आदींमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी प्रभागातील नगरसेवकांना याबाबत विचारणा करावी असे पंडित यांना सुचवायचे आहे. सण, उत्सव काळात बक्कळ।खर्च करून प्रभागात होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात येतात, शहर विद्रुप होतेच पण पायाभूत सुविधांची बोंब असल्याने नगरसेवकांनी त्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा पंडित यांनी त्या जनजागृतीद्वारे केली आहे.
मध्यंतरी पंडित यांनी कोपर उड्डाणपूल, शहरातील।पायाभूत गरजांच्या असूविधा यांसह खड्डे विषयी परखडपणे स्कुल बस मागे छोटे फ्लेक्स लावून राजकीय, मनपा प्रशासकीय अनास्थेवर आवाज उठवला होता. त्यामुळे शहरातील दुरावस्थेवर काही प्रमाणात अंकुश ठेवला जात असल्याची शेकडो पालक, विद्यार्थ्यांमद्ये चर्चा होते.