शाळकरी मुलांच्या रिक्षाला अपघा, डोंबिवलीतील धक्कादायक घटना; सुदैवाने रिक्षातील विद्यार्थी सुखरूप
By प्रशांत माने | Published: December 20, 2023 07:41 PM2023-12-20T19:41:40+5:302023-12-20T19:42:09+5:30
रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डोंबिवली: शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास पुर्वेकडील मानपाडा चार रस्ता येथे घडली. रिक्षात तीन विदयार्थी होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रमेश बागुल असे रिक्षाचालकाचे नाव आहे. मानपाडा चार रस्ता येथून विदयार्थी घेऊन जात असताना त्याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा रस्ता सोडून बाजुकडील एका दुकानात शिरता शिरता राहिली. रिक्षा थेट फुटपाथवर चढली आणि त्याठिकाणी पार्क असलेल्या मोटारसायकलला धडकली आणि थांबली. धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागील सीटवर दोन विदयार्थी बसले होते. मागे सीटवर जागा असतानाही एका विदयार्थ्याला चालकाच्या बाजूला बसविण्यात आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रसाद आपटे यांनी दिली. महत्वाचे म्हणजे रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याचेही समोर आले आहे. अपघात घडला तेव्हा रिक्षात तीन विदयार्थी होते परंतू एरव्ही दहा ते बारा विदयार्थी या रिक्षात असतात अशीही माहिती मिळत आहे.
आठ हजाराचा ठोठावला दंड
संबंधित रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याने तसेच निष्काळजीपणे वाहन चालविल्याने वाहतूक शाखेच्या वतीने त्याला आठ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान बेजबाबदार रिक्षाचालकाविरोधात कोणीही तक्रार केलेली नाही त्यामुळे त्याच्याविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही.
आरटीओ विभागाला जाग कधी येणार?
कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात त्यात शाळकरी मुले देखील अपवाद नाही. बेकायदा वाहतूकीकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर तरी आरटीओ विभागाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.