फ्रेंड्स कट्ट्यावर भरली सोशल मिडियाची शाळा; अनोखी शाळाच फ्रेंण्ड्स कट्ट्यावर शुक्रवारी भरवण्यात आली
By अनिकेत घमंडी | Published: October 14, 2023 12:04 PM2023-10-14T12:04:04+5:302023-10-14T12:04:17+5:30
सोशल मिडिया म्हणजे काय, हे सांगायची सध्या कोणालाही गरज नाही.
डोंबिवली: सोशल मिडिया म्हणजे काय, हे सांगायची सध्या कोणालाही गरज नाही. मात्र सोशल मिडियाचा वापर कसा करायचा आणि स्वतःची ओळख कशी निर्माण करायची याची नेमकी माहिती अनेकांना नसते. शिवाय स्मार्ट फोनचा योग्य वापरही काहींना करता येत नाही. यामागे प्रगत तंत्रज्ञानामागची एक भीती असते, ही भीती दूर करुन सोशल मिडियाचा व्यापक वापर कसा करता येईल, याची अनोखी शाळाच फ्रेंण्ड्स कट्ट्यावर शुक्रवारी भरवण्यात आली होती.
फ्रेंण्ड्स लायब्ररी आयोजित कट्ट्यावर भरलेल्या या अनोख्या शाळेत उपस्थितांनी सोशल मिडियाचा वापर सुलभरित्या कसा करायचे हे जाणून घेतले. टीम ओके देनच्या तरुण-तरुणींनी पै फ्रेण्ड्स कट्ट्यावरील सर्व उत्सुकांना स्मार्ट फोनचा वापर कसा करायचा आणि सोशल मिडियामध्ये सहजपणे कसे वावरायचे याचे उत्तम प्रात्यक्षिक दिले. लायब्ररीतर्फे दर पंधरा दिवसांनी होणा-या फ्रेण्ड्स कट्ट्यावर अभिनव कल्पना राबवण्यात येतात. त्यापैकीच ही एक कल्पाना. फेसबूक, वॉटसअप सारख्या सोशल मिडियाचा वापर कसा करायचा, ते वापरताना कोणती काळजी घ्यायची? या प्रश्नाची उकल कट्ट्यावर करण्यात आली. यासाठी त्या संस्थेचे समीर गुडेकर आणि सोनल सुर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
फेसबूक पेज आणि फेसबूक अकाऊंट यातील फरक काय असतो. फेसबूकचा वापर कसा करायचा, कुठलीही पोस्ट शेअर करतांना काय काळजी घ्यायची, तसेच फेसबूकच्या पेजला टॅग कसे करावे याची माहिती समीर आणि सोनल यांनी दिली. याशिवाय रिल आणि व्हिडिओ मधील फरकही सांगतला. सध्या सोशल मिडियाचा वापर सर्वदूर आहे. मात्र यामार्फत फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होतात. त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे सुद्धा यावेळी सांगण्यात आले. मोबाईल हॅक कसा केला जातो, त्यासाठी पासवर्ड ठेवतांना काय काळजी घ्यायला हवी, यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. वॉटसअप किंवा मेसेजद्वारे कुठल्याही बक्षिसाच्या अमिषाचे मेसेज येतात. या लिंक ओपन केल्यावर आर्थिक फटका बसू शकतो. यासंदर्भात काय काळजी घ्यायला हवी हे सांगण्यात आले.
याशिवाय इमेलचा वापर कसा करायचा. पासवर्ड कसा बदलायचा, वॉटसअप कसे वापरायचे, स्टेटस कसे बदलायचे, पीडीएफ फाईल म्हणजे काय, त्या कशा पाठवायच्या आणि वाचायच्या कशा, इमोजी कसे वापरायचे, मोबाईलमधील कीबोर्डवरील भाषा कशी बदलायची, मोबाईलच्या सॉफ्टवेअरमधील फरक आदी अनेक विषयावर या टीम ok then च्या टीमनं माहिती दिली. याशिवाय उपस्थितांनी अनेक प्रश्न विचारुन सोशल मिडियाचा वापर अधिक सुलभरित्या कसा करायचा हे जाणून घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रागिणी उपासनी यावेळी केले.