शाळा झाल्या सुरू... रेल्वे सेवाही सुरळीत, जनजीवन मात्र विस्कळीत
By अनिकेत घमंडी | Published: July 24, 2023 12:45 PM2023-07-24T12:45:27+5:302023-07-24T12:46:57+5:30
दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता, आभाळ काळ्या ढगांनी व्यापलेले होते, जोरदार सरींवर सरी पडत होत्या.
डोंबिवली: गेल्या आठवडाभर पावसाने ठाणे जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली होती, सोमवारीही पहाटेपासूनच पावसाने जोर धरला होता, सकाळी।पहिल्या सत्रात पावसाची संततधार सुरू होती. रेल्वे सेवा सुरळीत सुरू असली तरी कल्याण।डोंबिवली शहरातील नागरिकांची सकाळपासून लगबग सुरू होती. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू असली तरी जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या आठवड्यात मंगळवारनंतर जिल्हाधिकायांच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या।होत्या, सोमवारपासून शाळा।सुरू झाल्याने सकाळपासून विद्यार्थ्यांची ठिकठिकाणी धावपळ सुरू होती. सोमवार असल्याने डोंबिवली पूर्वेकडील आठवड्याच्या सुट्टीमुळे दुकाने बंद होती, भाजी बाजारात तुलनेने शुकशुकाट पसरला होता.
दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता, आभाळ काळ्या ढगांनी व्यापलेले होते, जोरदार सरींवर सरी पडत होत्या. दुपारच्या सत्रात शाळा सुटताना आणि भरताना विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. पालकांनी रेनकोट, छत्र्या देऊनही विद्यार्थी भिजले. रिक्षा वाहतुकीवर मात्र कोणताही परिणाम।झाला नव्हता, पाऊस असल्याने रिक्षेला पसंती सर्वाधिक होती, त्यामुळे शहरातील बहुतांशी रिक्षा स्टँडवर प्रवासी रिक्षेची वाट बघत होते. परिवहनच्या निवासी, लोढा, खोनी, नवनीतनगर भागासह अन्यत्र जाणाऱ्या बस सेवेला भरपूर मागणी होती, त्या बसेस प्रवाशांनी तुडूंब भरलेल्या होत्या. शहरातील सखल भागात पाणी साचलेले होते.
एमआयडीसी भागात भरपूर खड्डे झाल्याने तेथील वाहतूक मंदावली होती, अनेक वाहन चालकांनी घरडा सर्कल येथे गेल्यावर बंदिश हॉटेलमार्गे नाट्यगृहाच्या रस्त्यावरून नंदी पॅलेस समोरील रस्त्यावरून पुढे मार्ग काढला. तर काहींनी टाटा लेन मार्गे कल्याण ला जाणे पसंत केले.कल्याणवरून येणाऱ्या वाहनांनी ९० फिट रस्त्यामार्गे ठाकुर्लीत येऊन डोंबिवलीत जाणे पसंत।केले, त्यामुळे ठाकुर्लीच्या हनुमान मंदिर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. डोंबिवली शहराच्या पश्चिमेला देखील रेल्वे स्थानक परिसर वगळता अन्यत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. घनश्याम गुप्ते रस्त्यावरील व्यापारी ग्राहक नसल्याने अपेक्षित व्यवहार न झाल्याने चिंताग्रस्त होते. सर्वत्र महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित असली तरी खाडी किनार्यावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.