डोंबिवलीत मनसेला दुसरा धक्का, मंदार हळबे भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:19 AM2021-02-03T02:19:58+5:302021-02-03T02:20:29+5:30

KDMC Politics : केडीएमसीच्या निवडणुकीपूर्वी त्याचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम व काहींनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला.

Second blow to MNS in Dombivali, Mandar Halbe in BJP | डोंबिवलीत मनसेला दुसरा धक्का, मंदार हळबे भाजपमध्ये

डोंबिवलीत मनसेला दुसरा धक्का, मंदार हळबे भाजपमध्ये

googlenewsNext

डोंबिवली - केडीएमसीच्या निवडणुकीपूर्वी त्याचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम व काहींनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ मंगळवारी माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी सपत्नीक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दादर येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रवेश केला. त्यामुळे मनसेला २४ तासांत हा दुसरा धक्का सहन करावा लागला असून, डोंबिवलीत खऱ्या अर्थाने मनसेला खिंडार पडल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती.

२०१०च्या केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपमधून तिकीट न मिळाल्याने हळबे यांनी मनसेत प्रवेश करून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१५मध्येही रामनगर प्रभागातून ते निवडून आले. पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेते, गटनेते पद दिले होते. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. पण त्यात आमदार चव्हाण यांनी हळबे यांचा पराभव केला होता. त्याचवेळी हळबे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती.

अखेरीस, हळबे यांना भाजपमध्ये घेण्याची जबाबदारी चव्हाण यांनी पक्षाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार त्यांनी ती पार पाडली. अखेर चव्हाण यांनी वेळ साधून हळबे यांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक विशू पेडणेकर व हळबे समर्थक उपस्थित होते.

हळबे यांचे मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि नेते नितीन सरदेसाई यांच्याशी चांगले संबंध होते. हळबे यांच्या पक्ष कार्यालयाचा शुभारंभ ठाकरे यांनी केला होता. तसेच पक्षाने त्यांना काही कमी केले नाही; पण असे असतानाही त्यांनी पक्ष सोडल्याने मनसेत चर्चा सुरू होती. दरम्यान, हळबे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून, २०१० मध्ये त्यांना भाजपमधून तिकीट न मिळाल्याने ते मनसेत गेले.  आता ते दहा वर्षांनी पुन्हा भाजपमध्ये आल्याने त्यांच्या संपर्कातील संघ परिवारातील मंडळींनीही समाधान व्यक्त केले आहे.

हळबे यांनी सोमवारी रात्री पक्षाचा राजीनामा दिला, तेव्हाही त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले होते. मंगळवारी सकाळी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांच्याशी चर्चा करू, असेही ठरले होते, त्यानुसार ते दादरला पोहोचलेदेखील; परंतु त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग अचानक भाजप कार्यालयाकडे कसे वळले? यामागे काही अर्थ की राजकारण आहे, हे मात्र समजू शकले नाही.
- प्रमोद (राजू) पाटील, 
आमदार, नेते मनसे.

मी स्वगृही परतल्याचा आनंद आहे. पूर्वी भाजपचे काम केले आहे. त्यानंतर मनसेतही प्रामाणिकपणे काम केले. कोणाबद्दलही नाराजी नाही; पण शहरात जे काम करायचे आहे, त्यासाठी भाजपमध्ये पोषक वातावरण असल्याने पुन्हा भाजपमध्ये आलो. ‘कृष्णकुंज’वर बोलाविले होते; पण निर्णय झाला असल्याने तेथे गेलो नाही.
- मंदार हळबे, 
माजी नगरसेवक 

‘ते’ चुकले म्हणून माफी मागत आहेत - पाटील
 

कल्याण : मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर ‘मला माफ करा,’ अशी भावनिक पोस्ट टाकली आहे. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, ‘ते चुकले म्हणून त्यांनी माफी मागितली आहे. आम्ही चुकलो असतो तर आम्ही माफी मागितली असती.’
कदम यांच्या प्रवेशानंतर पाटील यांच्या पलावा येथील कार्यालयात मनसेचे शेकडो कार्यकर्ते सायंकाळी जमले. या वेळी पाटील यांनी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, शिवसेनेत जाणाऱ्यांची काही मजबुरी असेल. इतर काही प्रलोभनांना ते बळी पडले असतील. ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांचे घरगुती प्रश्नही त्याला जबाबदार असू शकतात. राज साहेबांवर त्यांचे प्रेम होते. त्यांच्या जाण्याचे नेमके कारण आम्हाला माहिती नाही. तरीही कारण आम्ही शोधून काढू. निवडणुका आल्या की, साम, दाम, दंड आणि भेद याचा वापर करून आपल्या पदरात काही पक्षातील लोक पाडून घ्यायचे, त्याचा हा पक्षप्रवेश असेल, अशी टीका पाटील यांनी शिवसेना नेत्यांवर केली आहे.
कोरोनाकाळात कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता सामान्यांसाठी काम केले. शिवसेना-भाजपची युती तुटलेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन खचली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षातील काही माणसे फोडून जमवाजमव केली असेल. मला नाही वाटत आगामी काळात त्याचा आम्हाला काही फरक पडेल. जे व्हायचे ते होणारच, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. 

डोंबिवली मनसे शहराध्यक्षपदी मनोज घरत 
कल्याण : डोंबिवलीच्या मनसे शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा रिक्त झाली. मनसेने लागलीच घरत यांची निवड केली.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात झालेली उलथापालथ पाहता पक्ष एकसंध राखण्याकरिता पक्षाने सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष पदाची धुरा हाती घेताच, पक्ष संघटना मजबूत करण्याचा मानस घरत यांनी व्यक्त केला.
डोंबिवली मनसेत राजेश कदम यांचा गट आणि विरोधी गट अशी विभागणी होती. दोन्ही गटांतील कुरबुरी थांबविण्याबाबत पक्षाने मौन बाळगले होते. कदम या गटाने मनसेला रामराम ठोकल्याने मनसेतील गटबाजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे कदम यांच्या जाण्याने आनंदाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी गटाकडून व्यक्त करण्यात आली.
कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सोमवारी रात्री ते डोंबिवली शिवसेना शाखेत परतले तेव्हा शिवसेना शाखेत कदम यांचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. 
या वेळी कदम यांनी फेसबुकवर ‘मला माफ करा’ अशी पोस्ट टाकली होती. त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्या कार्यकर्त्यांसोबत मी काम केले. त्यांची मी माफी मागितली आहे. तसेच कदम यांच्या पक्ष प्रवेशाविषयी मनसे आमदार राजू पाटील यांनी कदम यांची काही मजबुरी असू शकते, असे वक्तव्य केले होते. त्यावर कदम म्हणाले की, १६ वर्षे पक्ष वाढविला तेव्हा मजबुरी नव्हती. मग आताच कसली मजबुरी आली आहे?

Web Title: Second blow to MNS in Dombivali, Mandar Halbe in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.