"तुझ्या पक्षाचे बघ, माझ्या पक्षाची तिकीटे वाटू नको"; कपिल पाटील यांचा बाळ्यामामांना सल्ला
By मुरलीधर भवार | Published: July 20, 2024 07:10 PM2024-07-20T19:10:05+5:302024-07-20T19:11:01+5:30
४ जूननंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केल्याचाही केला उल्लेख
मुरलीधर भवार, कल्याण: हिंमत असेल तर विधानसभेची निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी माजी खासदार कपिल पाटील यांना केले होते. त्यांच्या या आव्हानाविषयी माजी खासदार पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तुझ्या पक्षाचे बघ, माझ्या पक्षाची तिकीटे वाटू नका, असा टोला माजी खासदार पाटील यांनी खासदार म्हात्रे यांना लगावला आहे.
कपिल पाटील फाऊंडेशन आणि भाजप कल्याण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी-बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन आज सकाळी आचार्य अत्रे रंग मंदिरात करण्यात आले होते. याप्रसंगी माजी खासदार पाटील यांनी उपरोक्त टोला खासदार म्हात्रे यांना लगावला.
माजी खासदार पाटील म्हणाले, "आम्ही जनतेचा कौल मानून पराभव पचविला आहे. ४ जूननंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. खासदार म्हात्रे यांना विजय पचविता येत नाही. जनतेने त्याना निवडून देऊन विकास काम व सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यांनी काम करुन दाखवावे. त्यासाठी सहा ते आठ महिने किंवा एक वर्ष घ्यावे. त्यानंतर आम्ही बोलू. लगेच आम्ही तुम्ही काय केले हे बोलणार नाही. आम्ही अजून काही बोलत नाही. कोणीही नवीन लोकप्रतिनिधी झाला. तर त्याला वेळ दिला पाहिजे. मात्र कपिल पाटलांचे नाव घेतल्याशिवाय टीआरपी मिळत नाही. काही संबंध नसताना नाव घेणे हे चूकीचे आहे. कशी निवडणूक लढवा. काय निवडणूक लढवा."
"माझी हिंमत मला कोणाला बघण्याची गरज नाही. माझ्याकडे प्रचंड क्षमता आणि ताकद आहे. मी काही कोणाच्या जोरावर आणि भरवश्यावर निवडणूका लढायला जात नाही. मला माझ्या पक्षाने सांगितले तर मी शंभर टक्के निवडणूक लढविणार. त्यासाठी खासदार म्हात्रे यांची मला परवानगी नको. मला खालच्या पातळीवर जाऊ भाष्य करायला आवडत नाही. ते मी करीत देखील नाही," याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, अर्जुन भोईर, शक्तिवान भोईर, डॉ. राजू राम, उपेक्षा भोईर, वैशाली पाटील, ज्योती भोईरआदी मान्यवर उपस्थित होते.