कोरोनानंतरही उद्यान कुलुपबंदच! ज्येष्ठ नागरिकाचे खासदारांना पत्र; दुरावस्थेकडेही वेधले लक्ष
By प्रशांत माने | Published: October 4, 2023 05:50 PM2023-10-04T17:50:10+5:302023-10-04T17:51:01+5:30
कोरोनाच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीतील सर्वच उदयाने बंद ठेवण्यात आली होती.
डोंबिवली : कोरोनाच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीतील सर्वच उदयाने बंद ठेवण्यात आली होती. निर्बंध शिथिल होताच टप्प्याटप्याने ती खुली केली गेली परंतू येथील पुर्वेकडील टिळकनगर प्रभागातील विश्राम उदयान आजही कुलूपबंद आहे. सुरक्षारक्षकांच्या कमतरेमुळे उदयान खुले केले नसल्याचे कारण केडीएमसी प्रशासनाकडून दिले जात असलेतरी ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने उदयान खुले करण्याबाबत थेट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना पत्रव्यवहार केला आहे.
रस्त्यावर वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीत सकाळ-संध्याकाळ वॉक करण्यासाठी नागरिक विशेष करून ज्येष्ठ नागरिकांकडून उदयानांचा आधार घेतला जातो. कल्याण डोंबिवलीत मनपा अथवा लोकप्रतिनिधींसाठी राखीव असलेल्या निधीतून उदयाने उभारली आहेत. उदयान उभारणीसाठी लाखो रूपये खर्च झाले आहेत परंतू डोंबिवलीतील विश्राम उदयान कोरोनानंतर आजही कुलुपबंद असल्याने ते बिनउपयोगी ठरत आहे. हे उदयान कुलुपबंद असलेतरी त्याची नियिमतपणे साफसफाई केली जात असे परंतू साफसफाईकडेही दुर्लक्ष झाल्याने उदयानात रान वाढले असून सुक्या फांदया आणि पालापाचोळा यांचे ढिग लागले आहेत. कुलुपबंद उदयानाच्या गेटच्या बाहेर दुचाकींचे पार्किंग होत आहे.
मनपाच्या उदयान विभागाच्या दुर्लक्षतेमुळे या उदयानाला एकप्रकारे अवकळा आली असताना ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिक विनायक रत्नपारखी यांनी उदयानाच्या या अवस्थेकडे कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. लवकरात लवकर उदयान खुले करण्यासाठी लक्ष घालावे हि मागणी करताना रत्नपारखी यांनी संबंधित उदयान देखभालीअभावी ‘कचराकुंडी’ झाल्याचे म्हंटले आहे. नजीकच्या परिसरात असलेले गावदेवी मंदिर परिसरातील नाना-नानी पार्क या उदयानात सकाळ-संध्याकाळ गर्दी होत असल्याने ती जागा अपुरी पडत आहे. अखेर वॉक करण्यासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागतोय याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
...तर ज्येष्ठांचे आशिर्वाद लाभतील
विश्राम उदयान बंद असल्याने ज्येष्ठांना मानपाडा रोडवरील नाना-नानी पार्कची वाट धरावी लागत आहे. मनपाचे विश्राम उदयानाकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. आपण यात लक्ष घालून हे उदयान सुस्थितीत चालू करून दयावे. आपणास ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद लाभतील असेही रत्नपारखी यांनी पत्रात नमूद केले आहे.