रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कल्याणमध्ये बसायला कुरकुर? एमडीआरएम, एजीएम दर्जाच्या अधिकाऱ्याची मागणी
By अनिकेत घमंडी | Published: June 30, 2024 10:27 AM2024-06-30T10:27:32+5:302024-06-30T10:27:37+5:30
मध्य रेल्वेकरिता कल्याण स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण, त्या ठिकाणी रेल्वेचा एकही उच्चपदस्थ अधिकारी बसत नाही.
अनिकेत घमंडी
लाेकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : मध्य रेल्वेकरिताकल्याण स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण, त्या ठिकाणी रेल्वेचा एकही उच्चपदस्थ अधिकारी बसत नाही. एडीआरएम, एजीएम दर्जाचा अधिकारी कल्याण येथे बसू लागला, तर दररोजच्या लोकल गोंधळावर नियंत्रण येईल, असे प्रवाशांना वाटते. गोरा ब्रिटिश साहेब देश सोडून गेला, पण मध्य रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील गोऱ्या साहेबाची प्रवृत्ती गेलेली नाही. त्यामुळेच लक्षावधी प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे रेल्वेचे तुघलकी प्रशासन सहानुभूतीने पाहत नाही. रेल्वेच्या एका तरी वरिष्ठ अधिकाऱ्याने कल्याण जंक्शन येथे बसावे, यासाठी २०११ मध्ये तत्कालीन खासदार आनंद परांजपे, त्यानंतर खा. संजीव नाईक, सुरेश टावरे, बळीराम जाधव यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र, २०१४ नंतर केंद्रात सत्तांतर झाले आणि त्या मागणीला केराची टोपली दाखविली गेली.
कल्याणमध्ये भारतीय रेल्वेचा कल्याण रेल्वे यार्ड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून, त्यासाठी सुमारे २२० एकर जागा रेल्वेकडे उपलब्ध आहे. त्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याबद्दल रेल्वेचे केंद्र, मुंबई विभागीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्याचा आराखडा अवगत आहे. त्याचे काम कूर्मगतीने सुरू आहे. ते झपाट्याने होण्यासाठी मुंबई विभागातील अधिकारी लक्ष देत नाही. एकूणच मध्यरेल्वेचे लाखों प्रवासी या रोजच्या त्रासातून सूटण्याची वाट पाहत आहेत. हे तितकेच खरे आहे.
५० वर्षांपासून पॉवर हाउस बंद
- ठाकुर्लीतील चोळा येथील ब्रिटिशकालीन पॉवर हाऊस बंद पडून ५० वर्षे झाली, परंतु त्या जागेचा योग्य वापर रेल्वेने केलेला नाही. त्या मोकळ्या भागातून रेल्वेचे भंगार चोरी होते.
- तेथे अनैतिक धंदे, नशाबाजी असे उद्योग सर्रास सुरू असतात. त्याचा ताण स्थानिक पोलिस, लोहमार्ग पोलिस, आरपीएफ यंत्रणांवर पडतो.
संघटनांचे म्हणणे काय ?
- सह विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि सह व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय येथे हलविल्यास या भागातील रेल्वे अधिकाऱ्यांमधील मरगळ दूर होईल, प्रकल्पाच्या कामात आलेली शिथिलता झटकली जाईल, असे संघटनांचे म्हणणे आहे.
- प्रवासी संघटना अथवा सामान्य प्रवासी यांना तक्रार करायची असेल, तर थेट मुंबईत जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे जावे लागते. कल्याणला वरिष्ठ अधिकारी बसले, तर येथेच तक्रार करणे व त्यावर उपाय करणे सोपे होणार आहे.
अधिकारी पाहतात आपली सोय
- मध्य रेल्वेवरील प्रवासी अपघात कल्याण-ठाणेदरम्यान होतात. रेल्वेच्या नव्या पुलामुळे मुंब्रा भागात लोकल एका दिशेला कलंडते, दरवाजात उभे असणाऱ्या प्रवाशांचा हात लोकलच्या खांबावरून किंवा डब्यावरच्या खाचेतून निसटतो आणि प्रवासी थेट खाली पडतो.
- ही वस्तुस्थिती पाहायला रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतः येणे गरजेचे आहे, पण उत्तरेतून किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागांतून मुंबईत नियुक्त होणारे अधिकारी आपली सोय पाहतात व दिवस ढकलतात.
... तर लोकलचा गोंधळ आटोक्यात येईल
- मुंबईतील वातानुकूलित दालनात बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये ठाण मांडले, तर लोकलचा गोंधळ आटोक्यात येईल व रेल्वे यार्ड प्रकल्पालाही गती मिळेल.
- उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था, ठाणे, दिवा, वांगणी, कल्याण, कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, के-थ्री संघटना या प्रवासी संघटना त्यासाठी प्रयत्नशील आहेत; मात्र दक्षिण मुंबईत वास्तव्य करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांची कल्याणपर्यंत दररोज प्रवास करण्याची इच्छाशक्ती नाही.