कल्याण-डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरणाच्या हालचाली पुन्हा सुरू, कुशिवली धरण आरक्षित करण्याची आमदारांची मागणी
By मुरलीधर भवार | Published: December 7, 2023 04:46 PM2023-12-07T16:46:56+5:302023-12-07T16:47:04+5:30
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली.
कल्याण- कल्याण डोंबिवलीसाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. ज्याला ठाणे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि कल्याण डोंबिवली महापालिकेने तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होते. या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
कल्याण डोंबिवलीतील नागरीकरण वाढत असताना मूलभूत सोयी सुविधांवर येत आहे.त्यामुळे शहरातील बऱ्याचशा नव्या गृह संकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. येत्या काळात ही पाणी समस्या अतिशय उग्र रूप धारण करेल याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली. अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा केडीएमसीला देण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणताही वेळ न घालविता ठाणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देत जिल्हा आणि महापालिका प्रशासनाची एक संयुक्त बैठक घेण्या यावी. त्यानुसार नुकतीच या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी कुशिवलि धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंपदा विभागाला तर पुढील तीस वर्षातील कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील संभावित लोकसंख्या आणि पाण्याची गरज यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.
भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता मुबलक पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण आरक्षित करणे ही आवश्यक बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी अतिशय संवेदनशील असून येत्या काळात स्वतंत्र धरण आरक्षीत करण्याचा निर्णय घेतील असा विश्वास आमदार भोईर यांनी व्यक्त केला आहे.
शहराची लोकसंख्या २० लाखाच्या घरात आहे. या लोकसंख्येनुसार प्रति दिन ४२३ दशलक्षलीटर पाणी पुरवठा होत आहे. पुढील तीस वर्षांचा टप्प्या टप्प्याने विचार करता २०३४ मध्ये लोकसंख्या ३४ लाख ९० हजार आणि प्रतिदिन गरज ६१६ दशलक्षलीटर, २०४२ मध्ये ५० लाख ८८ हजार आणि प्रतिदिन गरज ८९८ दशलक्षलीटर तर २०५२ मध्ये लोकसंख्या ७४ लाख आणि पाण्याची प्रतिदिन गरज १ हजार ३१० दशलक्ष लिटर भासणार आहे.