उड्डाणपुलाचे सात गर्डर डोंबिवलीत दाखल; शिवसेनेकडून नारळ फोडून कामाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 12:02 AM2021-03-23T00:02:33+5:302021-03-23T00:02:56+5:30
भाजपची दिरंगाईवरून टीका
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाचे २१ पैकी सात गर्डर सोमवारी पहाटे डोंबिवलीत दाखल झाले. त्याचा शिवेसना पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून आनंद व्यक्त केला. त्यानंतर मात्र आयुक्तांसमोरच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरत कामात दिरंगाई झाल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. तीन टप्प्यात गर्डर बसवण्यात येणार आहेत.
शहराला पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा उड्डाणपूल धोकादायक झाल्याने मध्य रेल्वेने २०१९ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. अगोदर पूल बंद करून लॉकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० मध्ये पाडण्यात आला. ४५ मीटर पुलाचे काम संथ गतीने सुरू होते. लॉकडाऊननंतर कामाला वेग आला. आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन टप्प्यात या पुलाचे २१ गर्डर बसविले जाणार आहेत.
शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि पदाधिकारी राजेश कदम यांनी घरडा सर्कल येथे जाऊन सकाळी सहा वाजता नारळ फोडून त्याबद्दल आनंद व्यक्त केला. म्हात्रे म्हणाले की, पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून, लवकरच तो त्रास कमी होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व आमदार रवींद्र चव्हाण हे पुलाच्या कामाजवळ पोहोचले. आयुक्त सूर्यवंशी यांनी नारळ फोडून गर्डर टाकण्याचे काम सुरू झाल्याचे जाहीर केले. लवकर हे काम मार्गी लागणार असून, मेअखेरीस पूल खुला होण्याचे संकेत देत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. मात्र, स्थानिक आमदार चव्हाण यांनी नारळ फोडण्यास नकार दिला. चव्हाण यांनी रेंगाळलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जबाबदार धरले. २० महिने उलटून गेले असून, आता गर्डर येत आहेत. दिरंगाई का झाली, हे प्रशासन सांगत नाही. महापालिका हद्दीतील अनेक प्रकल्प प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रखडले आहेत, असे चव्हाण म्हणाले.
मेअखेरपर्यंत कोपर पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता
पुलाच्या कामाचे गर्डर हे औरंगाबाद येथून आले असून, जागेअभावी २१ पैकी ७ गर्डर आणण्यात आले. याचे काम पूर्ण होताच अन्य दोन टप्प्यात गर्डर येतील. मधल्या मोठ्या भागात प्लास्टर, डांबरीकरण केले जाईल, त्यानंतर एप्रिलअखेर अथवा मे मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे महापालिका प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी स्पष्ट केले. त्यावेळी महापालिका शहर अभियंता सपना कोळी, माजी नगरसेवक विष्णू पेडणेकर, विश्वनाथ राणे आदी उपस्थित होते. ब्रिजच्या उभारणीकरिता रेल्वे ट्रॅकपासून राजाजी पथपर्यंत तीन टप्प्यांत तीन गर्डर चढविण्यात येणार आहेत. पहिल्या फेजमध्ये १५ मीटरचे सात गर्डर टाकले जातील आणि पुढच्या फेजमध्ये १२ मीटरचे आणखी सात गर्डर टाकले जातील आणि पुन्हा १८ मीटरचे सात गर्डर टाकले जाणार आहेत. या कामामुळे वाहतूककोंडी होऊ नये म्हणून रामनगर ते राजाजी पथ मार्गे डोंबिवली पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना रामनगर रिक्षा स्टॅण्डपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला होता. तसेच आयरे गाव, आयरेरोड, डोंबिवली पूर्व परिसरातही राजाजी पथ मार्गे रेल्वे स्टेशन, रामनगरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना राजाजी पथ गल्ली क्र.१ च्या कडेला गर्डरचे काम होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.