कल्याणमध्ये सात लाखाची रोकड जप्त; एसएसटी पथकाला यश
By मुरलीधर भवार | Updated: May 15, 2024 20:07 IST2024-05-15T20:07:08+5:302024-05-15T20:07:13+5:30
कल्याणमध्ये एसएसटी पथकाने सात लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे.

कल्याणमध्ये सात लाखाची रोकड जप्त; एसएसटी पथकाला यश
कल्याण - कल्याणमध्ये एसएसटी पथकाने सात लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे. कल्याण स्टेशनमधून कल्याण पूर्वेत येणाऱ्या एका नागरिकाकडून ही रक्कम जप्त करण्याची कारवाई आज करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकात एसएसटी पथकातील कर्मचारी तिकीट खिडकीजवळ काही प्रवाशांच्या समानाची तपासणी करीत होता.
यावेळी पूना लिंक रोड कोळसेवाडी परिसरात राहणारा जयेश पोटे याच्या जवळील बॅगेची तपासणी केली असता त्याच्याकडे सात लाख रुपयांची रोकड मिळून आली. या रोख रक्कमेविषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याला नीट उत्तरे देता आली नाहीत. रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. ही रक्कम जप्त केल्याची माहिती एसएसटी पथक प्रमुख दीपेश राठोड यांनी दिली आहे. या पूर्वी गेल्या आठवडयात दोन लाख रुपयांची रोख रक्कम पथकाने जप्त करण्याची कारवाई केली होती.