लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 06:08 AM2024-05-13T06:08:17+5:302024-05-13T06:09:10+5:30
राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रेची नरेंद्र मोदी टिंगलटवाळी करीत आहेत, याबद्दल शरद पवार यांनी नाराजी प्रकट केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: आपला देश संसदीय लोकशाहीला मानणारा आहे. पण मोदी लोकशाही मानत नाहीत. लोकशाही न मानणाऱ्या मोदींची पावले हुकूमशाहीकडे पडत आहेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी कल्याणमध्ये केली.
येथील यशवंतराव चव्हाण मैदानात भिवंडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले हाेते. नेहरू आणि गांधी घराण्याने देशासाठी दिलेले योगदान कोणी नाकारू शकत नाही. जगाला भारताची ताकद दाखवून देणाऱ्या इंदिरा गांधींची हत्या झाली, देशात आधुनिकीकरणाची सुरुवात करणाऱ्या राजीव गांधी यांची हत्या झाली. गांधी–नेहरू कुटुंबाचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यांचे हे योगदान, कर्तृत्व मान्य करून त्याचा सन्मान करण्याऐवजी राहुल गांधी आणि त्यांनी काढलेल्या पदयात्रेची मोदी टिंगलटवाळी करीत आहेत, याबद्दल पवार यांनी नाराजी प्रकट केली.
‘शहापुरातील पाणीप्रश्न सत्तेत आल्यास सोडवू’
इंडिया आघाडी सत्तेत आल्यास पुढील पाच वर्षांत शहापूरमधील पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. तालुक्यात कुठेही टँकर दिसणार नाही, अशी ग्वाही शरद पवार यांनी रविवारी वाशिंदमध्ये झालेल्या प्रचारसभेत दिली.